सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आता जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनीच थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी कणकवली बाजारपेठेत सुरू असलेल्या एका मोठ्या मटका अड्ड्यावर स्वतः छापा टाकत अवैध धंद्यांचा पर्दाफाश केला. या छाप्यात पोलिसांनी मुख्य मटका बुकी महादेव रमाकांत घेवारी याच्यासह एकूण १२ जणांना ताब्यात घेतले असून, तब्बल रु. २ लाख ७८ हजार ७२५ रोख रक्कम, मोबाईल आणि लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​कणकवली बाजारपेठेतील घेवारी कॉम्प्लेक्समध्ये महादेव रमाकांत घेवारी हा खुलेआम मटका व्यवसाय चालवत होता. पोलिसांना याविषयी वारंवार माहिती देऊनही कोणतीही कारवाई होत नव्हती, त्यामुळे अखेर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः यात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला.

​गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास, पालकमंत्री राणे काही निवडक सहकाऱ्यांसोबत थेट घेवारी यांच्या अड्ड्यावर पोहोचले. अचानक पालकमंत्र्यांना समोर पाहून मटका चालवणाऱ्यांची आणि तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. त्यावेळी १० ते १२ जण पैसे मोजणे, पावत्या करणे अशी कामे करत होते. हे दृश्य पाहून राणे संतप्त झाले. त्यांनी तात्काळ संबंधित लोकांना खडसावले आणि “हा काय प्रकार आहे? तुम्हाला लाज वाटत नाही का?” अशा प्रश्नांची सरबत्ती करत सगळ्यांना आहे त्या ठिकाणी थांबण्याचे आदेश दिले.

​तात्काळ त्यांनी कणकवली पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू केली.​छापा टाकल्यानंतर पालकमंत्री राणे यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना जाब विचारताना ते म्हणाले, “आम्हाला मटका अड्ड्यावर धाड टाकावी लागते, मग पोलीस यंत्रणा काय करते? तुम्हाला वारंवार माहिती देऊनही कारवाई का होत नाही?”

​याचवेळी राणे यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली. अवैध धंदे बंद करण्यासाठी आम्हाला थेट घटनास्थळी जावे लागत असेल, तर पोलीस यंत्रणा काय करत आहे? असे विचारत त्यांनी भविष्यात असे चालणार नाही, असा इशारा दिला. तसेच, पुरावा म्हणून मटका अड्ड्याचा व्हिडीओ कॉलवर दाखवला. या कारवाईनंतर राणे यांनी याप्रकरणी पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार करून दोषींवर कडक कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

​या प्रकरणात पोलिसांनी महादेव रमाकांत घेवारी (६५) याच्यासह एकूण १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात रवींद्र श्रीपत चव्हाण (४४), मयुर मनोहर पांडव (३०), संदीप शंकर पडवळ (४६), चंद्रकांत शंकर गवाणकर (५७), प्रशांत शशिकांत घाडीगावकर (४६), महेश आत्माराम बाणे (२७), अनिल श्रीपत पाष्टे (४८), सतीश विष्णू गावडे (४०), संतोष शंकर राठोड (४३), तुषार यशवंत जाधव (४२) आणि महेंद्र चंद्रकांत देवणे (३५) यांचा समावेश आहे.

​या कारवाईमुळे कणकवलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पालकमंत्र्यांनी केवळ कणकवलीतच नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंदे मुळापासून उखडून टाकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पोलिसांना यापूर्वी दिलेल्या ८-१० ठिकाणांच्या माहितीवर कारवाई न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.