अहिल्यानगर: श्रीरामपूरमधील चित्रकार भरतकुमार उदावंत व रवी भागवत या कला क्षेत्रातील गुरू-शिष्याच्या जोडीने अल्सरग्रस्त रुग्णाच्या मदतीसाठी ‘रंगरेषा मदतीच्या’ हा उपक्रम राबविला. या उपक्रमातून श्रीरामपुर शहरातील रुग्णाला तब्बल १ लाख रुपयांची मदत उभी राहिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीरामपूर शहरातील योगेश वांढेकर हा तरुण अल्सरग्रस्त आहे. पुण्यातील केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. वांढेकर यांचा आजार तिसऱ्या टप्प्यात असल्याने उपचाराचा खर्च मोठा होता. ही माहिती श्रीरामपुर पत्रकार संघ व चित्रकार भागवत यांना समजताच त्यांनी वांढेकर यांच्या मदतीसाठी ‘रंगरेषा मदतीच्या’ हा उपक्रम आझाद मैदानावर राबविला. श्रीरामपूर पत्रकार संघ व सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे विविध समाज माध्यमांवर आवाहन केले. श्रीरामपूर नगरपरीषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांचे अर्कचित्र काढून या उपक्रमाला आरंभ करण्यात आला.

दिवसभरात उदावंत व भागवत यांनी १०० हून अधिक कलारसिकांचे अर्कचित्र रेखाटले. सायंकाळी ६ वाजता जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनीही या उपक्रमाला भेट देत भागवत यांच्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातून स्वत:चे अर्कचित्र रेखाटले. उपक्रमाचा समारोप करताना ओला म्हणाले, श्रीरामपूरची पत्रकारीता संवेदनशील आहे. पत्रकार व चित्रकार भागवत, त्यांचे गुरू उदावंत यांच्या दायित्वाला सलाम.

कला रसिकांनी अर्कचित्र साकारल्यावर दिलेली मदत १ लाख रुपये जमली. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या हस्ते ही रक्कम पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. गाडेकर यांनी हा मदत निधी वांढेकर यांच्या बँक खात्यात उपचारासाठी वर्ग केला.

सलग ९ तास अर्कचित्रे रेखाटली

सकाळी १० वा. अर्कचित्र रेखाटण्यास सुरुवात झाली. सायंकाळी ७ वा. या दोन्ही चित्रकारांनी शेवटचे अर्कचित्र रेखाटले. नाष्ट्यासाठी घेतलेला पाच मिनिटांची विश्रांती वगळता उदावंत व भागवत यांनी ९ तास सलग अर्कचित्र काढण्याचा विक्रम नोंदवला. त्यांच्या या कलादायित्वाचे श्रीरामपूरकरांनी कौतूक केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru shishya raise rs 1 lakh through painting for patient treatment zws