जिल्हय़ात बुधवारी संध्याकाळी व गुरुवारी पहाटेसही गारपिटीने तडाखा दिला. गेल्या काही दिवसांपासून पडणारा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्हय़ातील पिकांचे नव्याने ७ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले. आतापर्यंत किमान २५ हजार हेक्टर क्षेत्राला निसर्गाच्या अवकृपेचा फटका बसला असून, पिकांच्या प्रचंड नुकसानीने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे.
लातूर व औसा तालुक्यांत काल व आज पहाटेस झालेल्या गारपिटीच्या तांडवामुळे नव्याने ८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले. त्यामुळे जिल्हय़ातील गारपीटग्रस्त क्षेत्र तब्बल २५ हजार हेक्टरवर पोहोचले आहे. बुधवारी सायंकाळी लातूर, बाभळगाव, ममदापूर, बोरी, कोळपा, सोनवती, भडी, भातखेडा आदी परिसरातील ११ गावांत गारपीट झाली. यात शेकडो एकर जमिनीचे नुकसान झाले. बुधवारी मध्यरात्रीनंतर व गुरुवारी पहाटेच्या सुमारास औसा तालुक्यातील किणीनवरे, किणीथोट, तांबरवाडी, राजेवाडी, लामजना, किल्लारीवाडी, गुबाळ, मंगरूळ, पोमादेवी जवळगा, दापेगाव आदी गावांत गारपिटीने दणका दिला. यात सुमारे ७ हजार हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवरील पिके नेस्तनाबूत झाली. सुमारे अर्धा तास गारांचा वर्षांव सुरू होता. गारांचा आकार लिंबापेक्षा मोठा होता. गारांच्या माऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे वाकून तुटले व घरात पाणी शिरले. गारपिटीच्या जोडीला वाऱ्याचा वेगही जास्त असल्यामुळे अनेक झाडेही पडली. घरावरील पत्रे एक-दोन किलोमीटर दूरवर उडाले. अनेक ठिकाणी तर झाडांची पानेही शिल्लक राहिली नाहीत. शेतातील उभ्या पिकांसह करडी, गहू, ज्वारी, हरभरा, तुरीचे प्रचंड नुकसान झाले.
शिवारात जिकडे पाहावे तिकडे पिकांची नासाडीच दिसून आली. तांबरवाडी गावचे माजी सरपंच गोिवद बाजुळगे यांनी गारपिटीच्या माराचे वर्णन करताना शेतात जाण्याचे आता धाडसच होत नाही, इतके नुकसान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. किल्लारी भूकंपानंतर निसर्गाने पुन्हा आमचे जगणे मुश्कील केले असल्याचे सांगितले. नुकसान कित्येक कोटींच्या घरात आहे. मदतीची हाक कोणाला मारायची, हा मोठा प्रश्न असल्याचे ते म्हणाले.
किल्लारीचे प्रकाश पाटील यांनी तळणी, लामजना, कारला, तपसे चिंचोली, किल्लारीवाडी भागात गारपिटीने केलेल्या नुकसानीची माहिती दिली. शेतावर काढून टाकलेल्या करडय़ावर गारपिटीचा मारा एवढा होता, की आतील करडे फुटून शेतावर पसरले. कातडे सोलावे याप्रमाणे ज्वारीची धाटे सोलली गेली. एखाद्या दंगलीत दगडांचा मारा झाल्यानंतर वाहनांची जी अवस्था होते, तशीच अवस्था अनेक वाहनांची गारांच्या माऱ्यामुळे झाली. सुमारे शंभरपेक्षा अधिक जनावरे जखमी झाली, तर ४ जनावरे दगावली आहेत.
औसा तालुक्यातील ४० गावे गारपिटीमुळे अंधाराच्या छायेत आहेत. औसा, निलंगा व लातूर तालुक्यांत गेल्या २४ तासांत पावसाने धुमाकूळ घातला. लामजना येथे ४६ मिमी, पानचिंचोली ३०, किणीथोट मंडलात २५, आंबुलग्यात १७, तर मुरूडमध्ये २५ मिमी पाऊस झाला. गारपीटग्रस्त भागात पंचनाम्यासाठी कृषी व तहसील कर्मचारी दाखल झाले. मात्र, हे पंचनामे झाल्यावर शेतकऱ्यांना जी मदत भविष्यात मिळणार आहे, ती सरकारच्या पूर्वीच्या निकषावर असणार आहे. त्यामुळे ही मदत खूपच तुटपुंजी राहणार आहे.
९०० खांब कोसळले, अनेक गावांत बत्ती गूल
आभाळच फाटल्यावर ठिगळ कुठे लावायचे, हा प्रश्न निर्माण होतो. दररोज पाचपंचवीस गावांत गारपिटीचा मारा होऊन व वादळी वाऱ्याने विजेचे शेकडो खांब जमीनदोस्त होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. गेल्या ३ मार्चपर्यंत ७००पेक्षा अधिक विजेचे खांब आडवे झाले. गेल्या दोन दिवसांतील पावसाने २०० खांबांची नव्याने भर पडली. सर्वच तालुक्यांत हा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणचे २ कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले. आठ दिवसांत बाधित गावात वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे महावितरणचे प्रयत्न असल्याचे अधीक्षक अभियंता बी. आर. कारंडे यांनी सांगितले. शेतीपंपाची वीज सुरू होण्यास किमान महिना लागू शकतो. परंतु ती सुरू झाली तरी त्याचा उपयोग आता शेतकऱ्यांनी कशासाठी करायचा, हाही प्रश्नच आहे.