राज्यातील करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा आता ४२ वर पोहोचला आहे. दरम्यान, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. करोना हा आजार बरा होणारा आजार आहे. त्यासाठी योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. राज्यात ८५० लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ४२ रूग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसंच पदेशातून आलेल्यांची तसंच करोनाची लक्षणं आढळलेल्यांचीच चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सध्या ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे. सोसायटीतल्या लोकांनी रूग्णांशी माणुसकीला धरून वर्तन करावं. त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देणं योग्य नाही. कोरोनाचा आजार हा उपचार घेऊन बरा होणारा आहे. त्यामुळे रूग्ण आढळल्यास त्यांना १४ दिवसांचं विलगीकरण करावं, उपचार करावेत, असं टोपे यांनी स्पष्ट केलं. बाहेरच्या देशातून आलेल्यांची व लक्षणे आढळलेल्यांचीच चाचणी करण्यात येणार आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, यावेळी त्यांनी सर्वांच्या सहकार्यानं करोनावर मात करण्याचा विश्वास व्यक्त केला. अत्यावश्यक सेवा कुठल्याही स्थितीत बंद करणार नाही, परंतु अनावश्यक व्यवहार बंद करायला हवे, असं त्यांनी नमूद केलं. पालिकांशी संपर्क साधून ज्वेलर्स, कपड्यांसारखी सारखी दुकानं बंद ठेवण्यासाठी सांगण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.