अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात घडली. जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील माटरगाव गावाजवळील पूर्णा नदीच्या काठावरुन एक विना नंबरचा टिप्पर रेती घेऊन खामगाव शहराकडे जात असल्याची माहिती जलंब पोलीस ठाण्याचे स्टेशनचे पोलीस उमेश सिरसाट यांना मिळाली. माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्यासोबत एका होमगार्डला घेऊन दुचाकीनं त्या वाळूची वाहतूक करणाऱ्या गाडीचा पाठलाग केला.

पाठलाग करत असलेल्या उमेश शिरसाट यांनी काही अंतरावर या गाडीच्या पुढे जाऊन आपली दुचाकी टिप्पर पुढे आडवी करून उभी केली. दरम्यान, यानंतर टिप्पर चालकाने आपले वाहन थेट पोलीस कॉन्स्टेबल उमेश सिरसाट यांच्या अंगावरून पुढे नेले. त्यानंतर पुन्हा एकदा त्यानं आपलं वाहन त्यांच्या अंगावरून नेलं.

आणखी वाचा- “हॉटेलची तपासणी का केली?”, सोलापुरात पेट्रोल टाकून पोलिसाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

त्यानंतर टिप्पर चालकानं या वाळूच्या गाडीसह खामगावकडे पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळावर पोहोचले. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. तसंच वाहनाचा शोध घेण्याचं कामही सुरू आहे.