मुंबई : गेल्या आठवड्यात चढा असलेल्या तापमानाच्या पाऱ्यात आता काहीशी घट झाली असली तरी मुंबईकरांना आता तप्त उन्हाळ्यासाठी तयार राहावे लागणार आहे. यंदा उन्हाळ्यात (मार्च ते मे) मुंबईत कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज असून उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रताही अधिक असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उकाडा आणि उन्हाचा तडाखा सुरू झाला. कमाल तापमानाने सरासरी ओलांडली. आता मार्च महिन्यातही नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी ३२.८ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानात काहीशी घट झाली असली तरी अधूनमधून त्यात वाढ होईल. हवामान उष्ण व दमट असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

काही वेळेस ढगाळ वातावरणाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. मार्च महिन्याच्या अखेरीस तापमानाच्या पाऱ्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीमध्ये साधारणपणे मुंबईचे सर्वाधिक कमाल तापमान ३६ ते ३८ अंशांपर्यंत पोहोचते. फेब्रुवारीच्या मध्यानंतर तापमान वाढ व्हायला सुरुवात होते. फेब्रुवारीचा दुसरा पंधरवडा आणि मार्चचे पहिले काही दिवस तापमानामध्ये चढ-उतार होत राहतात.

मुंबईला समुद्रकिनारपट्टी लाभल्याने हा पारा सतत चढता नसतो. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानामध्ये घटही होते. एकाएकी तापमानाचा पारा वर चढतो, मात्र त्यानंतर तापमान चढेच राहील, असे नसते. ते थोडे खालीही उतरते. मात्र हिवाळ्यासारखा दिलासा आता अनुभवता येणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imd predict maximum and minimum temperatures in mumbai expected to be above average mumbai print news zws