‘महाराष्ट्र भूषण’ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्री विठ्ठलाचे दर्शन न घेताच परतावे लागल्याच्या पाश्र्वभूमीवर श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येणारे अंध, अपंग, वयोवृद्ध भाविकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा भाविकांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने स्वतंत्र दर्शन रांग सुरू करावी या मागणीबरोबरच अशा भाविकांना मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर सोडण्याबाबत पोलीस प्रशासनाला सूचना देऊन विनाविलंब दर्शनाला सोडावे, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.
लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूरचे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी माता हे आराध्य दैवत आहे. या सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी शेकडो मल चालत भाविक येतात. येथील मंदिरात दर्शन घेण्यासाठी दर्शन रांग येथून पदस्पर्श दर्शन घेता येते. तर नामदेव पायरी येथून सभागृहातून मुख दर्शन तर रुक्मिणी पटांगण येथून व्हीआयपी दर्शन घेतले जाते. मंगळवारी महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे दर्शनासाठी आले होते. त्यांची गाडी पश्चिमद्वार येथे आली. त्यानंतर त्यांचे स्वीय साहाय्यक यांनी पोलिसांना पश्चिमद्वार येथून पुरंदरे यांना दर्शनाला सोडावे आशी विनंती केली. या वेळी व्हीआयपी गेटमधून जाता येणार नाही असे पोलिसांनी सांगितले. वास्तविक पाहता पुरंदरे यांचे वय आणि त्यांच्या प्रकृतीच्या मानाने त्यांना मंदिरातील चढउतार शक्य झाले नसते. त्यामुळे पुरंदरे दर्शन न करता माघारी गेले. त्यानंतर झाल्या प्रकाराचा शिवप्रेमी मंडळींनी निषेध नोंदविला. पोलिसांच्या या कृतीबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटली. राजकारण्यांना सारे माफ आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञाला मात्र वेगळा न्याय लावण्यात आल्याने त्याचा निषेध करण्यात येत आहे.
या घटनेनंतर येथे येणाऱ्या अंध, अपंग आणि वयोवृद्ध भाविकांच्या दर्शनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंदिराकडे जाण्यासाठी महाद्वार आणि पश्चिमद्वार असे दोन मार्ग आहे. या दोन्ही मार्गावर कोणत्याही भाविकांची चारचाकी गाडी थेट मंदिरापर्यंत जात नाही. फक्त मंत्री, अधिकारी अशा व्हीआयपी लोकांच्या गाडय़ा थेट मंदिरापर्यंत सोडल्या जातात. तेही पोलीस प्रशासनाच्या सूचनेवरून. मंदिराच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा कार्यान्वित आहे. मंदिराकडे जाणाऱ्या दोन मार्गावरील पोलिसांना जर संदेश मिळाला तर आणि तरच भाविकांची गाडी थेट मंदिरापर्यंत जाते. आता पुरंदरे यांच्या घटनेवरून मंदिर समितीने अंध, अपंग, वयोवृद्ध भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग सुरू करावी. तसेच पोलीस प्रशासनाला अशा भाविकांना मंदिरापर्यंत जाण्याबाबत वरिष्ठांच्या आदेशाची वाट न पाहता ‘माणुसकी’ दाखवून सौजन्याने वागण्याच्या सूचना संबंधित पोलिसांना द्याव्यात, अशी मागणी भाविकांतून होत आहे.
स्वतंत्र दर्शन रांगेसाठी प्रस्ताव तयार करणार : तेली
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन सुलभ व जलदगतीने व्हावे यासाठी मंदिर समितीचा नेहमी प्रयत्न असतो. अंध, अपंग, वयोवृद्ध भाविकांसाठी स्वतंत्र व्हीलचेअर समितीकडे आहे. जर भाविकांनी मागणी केली तर त्यांना ही सुविधा समिती देणार आहे. तसेच अंध, अपंग आणि वयोवृद्ध भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग करता येईल का? याबाबत मंदिर समितीचे सभापती तथा जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून याबाबतचा प्रस्ताव तयार करू असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली यांनी सांगितले.