Dr. Ganesh Devy on Marathi Language: “शाळेतून मराठी शिकवावी की मराठी खेरीज आणखी काय शिकवावं, या सरकारी धोरणांमुळं भाषांचं नुकसानही होत नाही आणि भाषांचा फायदाही होत नाही. केवळ सरकारच्या क्षमतांचं प्रतिबिंब त्यातून उमटतं. आताचं सरकार जर पहिलीपासून हिंदी शिकवा म्हणत असेल तर महाराष्ट्रातील मराठी भाषिक लोकांचा विचार न करता ते दिल्लीमधल्या सरकारने काय धोरण ठरवलं, त्याआधारे सूचना देत आहेत, असं आपण म्हणू शकतो. हे मराठी माणसावर अन्यायकारक आहे”, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी केले आहे.

एबीपी माझा वृत्तावाहिनीच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत असताना डॉ. गणेश देवी यांनी भाषेच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. एक व्यक्ती लहानपणी किती भाषा डोक्यात ठेवू शकतो? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “मानवी मेंदूतील भाषेच्या व्यवहारासंबंधी कोट्यवधी न्यूरॉन्स काम करतात. सक्ती नसेल तर पाच भाषाही लहान मुलगा आत्मसात करू शकतो. पण सक्ती असेल तर लहान मुलगा भाषा शिकत नाही.”

लहान मुलांना शाळेत कोणती भाषा शिकवली जावी? असाही प्रश्न डॉ. देवी यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, लहान मुलांच्या घरी जी भाषा बोलली जाते. ती भाषा शाळेत शिकवली जावी. शाळेची भाषा मुलांनी उचलावी, अशी सक्ती करणे हे खरंतर अमानवी आहे.

तिसरी भाषा लहान मुलांच्या आयुष्यात कधी येणे योग्य राहिल, असा प्रश्न डॉ. गणेश देवी यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, वयाच्या ११ वर्षी म्हणजे पाचवीत असताना तिसरी भाषा शिकविण्यात अडचण नाही. यावेळी मुलांच्या डोक्यात १५ ते १८ शब्दांचा खजिना लीलया खेळवू शकतात. या वयात नवीन नाणी खजिन्यात आली, तर मुलं ती सहज स्वीकारू शकतात. पण तिथंही जर सक्ती करून जमणार नाही. नव्या भाषेची गोडी निर्माण करताना आधीच्या भाषेला धक्का लावून चालणार नाही.

मनसेवर खोचक टीका

मनसेकडून मराठी भाषेचा आग्रह केला जातो. प्रसंगी हा आग्रह आक्रमकही होतो. यावर प्रश्न विचारल्यानंतर डॉ. गणेश देवी म्हणाले की, मनसेएवढा माझा भाषेचा अभ्यास नाही. त्यामुळे यावर मी बोलू शकत नाही. पण मनसेचा आग्रह दीर्घकाळ चालणार असेल तर मराठी भाषेला पुष्कळ काळ चांगले दिवस राहो, अशा शुभेच्छा मी देईल, अशी खोचक टीका गणेश देवी यांनी केली.