शहराच्या गजबजलेल्या दिल्लीगेट भागात आज भरदुपारी वृद्ध दाम्पत्याकडील ६० हजार रुपयांचे दागिने लुबाडण्यात आले. यासंदर्भात रत्नमाला किसन खरदास (वय ६५, रा. सखी अपार्टमेंट, साताळकर रुग्णालयाजवळ, बागरोजा हडको) यांनी तोफखाना पोलिसांकडे तक्रार केली आहे, त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 खरदास व त्यांचे पती जवळच्याच सातभाई गल्लीतील स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेतून ८ हजार रुपये काढून दोघे पायी घरी परतत होते. वाटेत किसन खरदास यांनी खिशातील रक्कम काढून पत्नीच्या पर्समध्ये ठेवण्यास दिली. तेवढय़ात दोघे जण त्यांच्याजवळ आले. पैसे व्यवस्थित ठेवा, गळय़ातील गंठण व इतर दागिने पिशवीत ठेवा, असे सांगतच या दाम्पत्याच्या नकळत त्यांनी ६० हजार रुपये किमतीचे दागिने लांबवले. बँकेतून काढलेली ८ हजार रुपयांची रोकड मात्र भामटय़ांनी पिशवीत ठेवली.