Jitendra Awhad on Malhar Mutton : मटण दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या धोरणाला मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी पाठिंबा दर्शवला. मात्र यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. हिंदूमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं विरोधकांनी म्हटलं असून आता जितेंद्र आव्हाड यांनीही हिंदूना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी मध्यरात्री एक्सवर पोस्ट केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हलाल हे धार्मिक सर्टिफिकेशन आहे. ते हायजिन सर्टिफिकेशन नाही. हिंदूंना हलाल मीट खाणे बंधनकारक नाही”, असं म्हणत जितेंद्र आव्हाड म्हणाले, “जगभरामध्ये प्रत्येक धर्माच्या मांसाहाराबद्दलचे काही रीती रिवाज आहेत. त्यातले काही धर्मग्रंथांमध्ये आचरण विषयक बाबी म्हणून स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहेत. काही संकेतानुसार पूर्वापार चालत आलेले आहेत.”

हलाल म्हणजे काय?

“उदाहरणार्थ मुस्लिम धर्मामध्ये मृत, आजारी प्राणी, रक्त, वराह मांस निषिद्ध करण्यात आलेले आहे. या प्रकारच्या मांसाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे मांस खाल्ले जाऊ शकते. एका विशिष्ट पद्धतीने मेंदूला रक्तपुरवठा करणारी जुगलर वेसेल कापून शरीरातील रक्ताचा निचरा करून त्या पद्धतीने तयार केलेले मांस म्हणजे हलाल मटण. ते मुस्लिम लोकांच्या खाण्यास योग्य आहे असे त्यांच्या धर्मग्रंथात म्हटलेले आहे”, असं जितेंद्र आव्हाडांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय.

झटका अन् कोशर मटण म्हणजे काय?

“शिखांच्या धर्मग्रंथांमध्ये तलवारीच्या एका झटक्याने मानेतून धड शिरापेक्षा वेगळे करून त्या पद्धतीने तयार केलेले मटण हे खाण्यास योग्य आहे असे म्हटलेले आहे. त्याला झटका मटण असे म्हणतात. ज्यु धर्मात लिगामेंट, वेसल्स व नर्वज वेगळे केल्यानंतर जे मांस शिल्लक राहते ते खाण्यास योग्य समजले गेलेले आहे. त्याला कोशर मटण असे म्हणतात. इतर धर्माच्या सर्व पुस्तकांमधे मटण कापण्याच्या व खाण्याच्या पद्धतींबद्दल लिहिलं आहे परंतु हिंदू धर्माच्या कुठल्याच ग्रंथात मटण कापायचे, खाण्याच्या पद्धतींबद्दल लिहिले नाही. का कारण? हे ग्रंथ लिहिणारे कोण होते? वेदांच्या आधीची पुस्तके वाचली, त्यात मांस निषिद्ध मानले नाही”, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय.

हिंदूंमध्ये कोणती पद्धत प्रचलित?

“हिंदू धर्माच्या सर्वसमावेशक गुणामुळे अथवा वृत्तीमुळे हजारो वर्षात मांस खाण्याबद्दल ज्या काही संकेत, प्रथा परंपरा निर्माण झाल्या आहेत, त्यात प्रचंड वैविध्य आढळून येतं. हिंदू धर्मातील काही जाती व जमातींमध्येसुद्धा काही पंथ, पोट जाती या शुद्ध शाकाहारी आहेत. इतर काही जाती विशेषत्वाने क्षत्रिय जाती या मांसाहारी आहेत पण त्या पोर्क म्हणजे डुकराचे मांस व बीफ म्हणजे गाय व म्हैस वर्गीय प्राण्यांचे मांस खात नाहीत. ते खाणे निषिद्ध आहे. तथापि हिंदू धर्मातील काही जाती मात्र वराह सेवन सुद्धा करतात तसेच बीफ सुद्धा खातात”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“एकाच जातीमध्ये सुद्धा शाकाहार व मांसाहाराचे नियम वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ ब्राह्मणांमध्ये शाकाहार हे प्रचलन असले तरी ब्राह्मणांच्या काही पोट जातींमध्ये मात्र मांसाहार निषिद्ध समजला जात नाही. त्या उलट ब्राह्मणांच्या या जातींनी माशांच्या, समुद्रजन्य प्राण्यांच्या जगातील सर्वोत्तम डिश, सर्वात चविष्ट रेसिपीज शोधून काढल्या आहेत”, अशी माहितीही त्यांनी दिली.

हा तर पब्लिसिटी स्टंट

ते पुढे म्हणाले, “जस-जसा काळ बदलला, खाण्याच्या पद्धती बदलल्या, तरीही भारतातील ९५% लोक मांसाहार करतात, त्यांना जर विचारले की तुम्ही आणलेले मटण हलाल आहे की झटका त्यांना ते सांगता यायचे नाही. त्यामुळे एखाद्या मटणाला मल्हार मटण म्हटलं काय, झटका मटण म्हटलं काय, हलाल मटण म्हटलं काय त्याचा फारसा परिणाम मटणाच्या गुणवत्तेवर होणार नाही आणि खाणाऱ्यावरही होणार नाही. हा सुद्धा एक पब्लिसिटी स्टंट आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad on malhar zataka and halal mutton give advice of inclusion to hindu community sgk