‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिंतेद्र आव्हाड यांना अलीकडेच ठाणे पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी आव्हाडांची जामिनावर सुटका झाली. सुटका झाल्यानंतर आव्हाडांनी सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले. माझ्यावर कठोर कारवाई करावी, म्हणून चाणक्याकडून पोलिसांवर दबाव टाकला जात होता, पोलिसांना फोन केला जात होता, असा आरोप आव्हाडांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आरोपानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. आव्हाडांनी उल्लेख केलेला चाणक्य आपणच आहोत, असा त्यांचा माझ्यावर रोख असेल तर मी त्यांचे आभार मानतो. कारण चाणक्य हा राजकारणातला चांगला माणूस होता, असं विधान म्हस्के यांनी केलं आहे.

हेही वाचा-“जितेंद्र आव्हाडांनी काही वैयक्तिक खर्चातून…”, एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “कौन किसकी शादी में…”!

म्हस्के यांच्या या विधानाचा आव्हाडांनी समाचार घेतला आहे. एकेरी उल्लेख करत आव्हाड म्हणाले, “नरेश म्हस्के हा चाणक्य नव्हे तर शकुनीमामाची औलाद आहे. मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की, नरेश म्हस्के आमदार नाहीत, ते मंत्रिमंडळात कधी आले नाहीत, विधानसभेचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. विधानपरिषदेचं सदस्यत्व देणार म्हणून त्यांना केवळ चॉकलेट दाखवण्यात आलं आहे. असं असूनही हा माणूस टीव्हीवर उघडपणे म्हणतो, ‘आता बघा जितेंद्र आव्हाड किती दिवस तुरुंगात बसतात’, ते असं विधान कसं करू शकतात, याची स्पष्टता मला सरकारकडून हवी आहे” अशी मागणी आव्हाडांनी केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ शी बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad on naresh mhaske chanakya and shakunimama dispute over arrest har har mahadev movie rmm