अशोक तुपे
लागवडीखालील क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न
ज्वारी व बाजरीची भाकरी हे गरिबाचे अन्न, त्यामुळेच त्यांची कृषीक्षेत्रातही कुचेष्टा होत राहिली. त्यांना भरडधान्य म्हणून संबोधले जात असे. आपल्या गुणधर्मामुळे गरिबांच्या घरातील ही भाकरी जशी पंचतारांकीत हॉटेलमध्ये पोहोचली तशीच डॉक्टरांच्या शिफारशीलाही पात्र ठरली. पण आता ज्वारी, बाजरीची दैना फिटणार असून केंद्र सरकारने त्यांचा पोषक (मूल्यवर्धित) तृणधान्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. केंद्र व राज्य सरकारने दोन्ही पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत.
कोरडवाहू क्षेत्रात ज्वारी, बाजरीचे पीक घेतले जाते. राज्यात ज्वारी १७ लाख हेक्टरमध्ये तर बाजरी ८ लाख हेक्टर क्षेत्रात पीक घेतले जाते. पूर्वी हे क्षेत्र ६६ लाख हेक्टरवर होते. लोकांच्या आहारातही ज्वारी, बाजरीची भाकरी असे. सार्वजनिक वितरण व्यवस्था आल्यानंतर शिधापत्रिकेवर गहू मिळू लागला. त्यामुळे ज्वारी, बाजरीचे बाजारातील दर पडले. भाव चांगले नसल्याने शेतकरी अन्य पिकांकडे वळले. मात्र ज्वारी व बाजरीमध्ये ग्लुटेन नसते. ज्वारीत पोषक तत्त्व जास्त असते. तंतुमय पदार्थ असल्याने सहज पचतात. बाजरीमध्ये प्रोटीन कमी असते, ग्लुटेन नसते. जस्त व लोहाचे प्रमाण जास्त असते. तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे आरोग्याला चांगली व पचायला सोपी असते. आता ज्वारी,बाजरीचे आहारातही महत्त्व वाढत असून पुन्हा लोकांच्या आहारात स्थान मिळवू लागले आहे.
केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी ज्वारी, बाजरीच्या प्रसारावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भरड धान्यातून त्यांची नावे केंद्र सरकारने काढून टाकली आहे. पोषक तृणधान्यामध्ये त्यांचा समावेश केला आहे. मंत्री राधामोहन सिंह यांनी बैठक घेऊन दोन्ही पिकांच्या प्रचारावर जोर दिला आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागानेही आगामी वर्षांत दोन्हीही पिकांच्या लागवडीत वाढ करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या बैठकीत कृषी आयुक्त डॉ. सचिंद्रप्रताप सिंह यांनी शास्त्र व कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना संबंधित सरकारच्या निर्णयाची माहिती दिली.
१४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय बालदिन साजरा केला जातो. या दिवशी मूल्यवर्धित तृणधान्य दिन साजरा केला जाणार आहे. ज्वारी, बाजरीचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून लोकांना त्याचे महत्त्व पटवून दिले जाईल. यापुढे कुठल्याही सरकारी परिपत्रकात ज्वारी, बाजरीचा उल्लेख भरडधान्य म्हणून केला जाणार नाही. तर तो मूल्यवर्धित तृणधान्य किंवा पोषक तृणधान्य म्हणून करण्याचा आदेश त्यांनी दिला. तसे परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्त डॉ. सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिली. बालदिनी कृषि विभागाचे अधिकारी हे सरपंच, नगराध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख यांना ज्वारी, बाजरीपासून बनविलेले पदार्थ भेट देणार आहेत. तसेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांना राष्ट्रीय अन्नप्रक्रिया संस्था व राष्ट्रीय तृणधान्य विकास संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहे. ज्वारी, बाजरीचे सुमारे दोन हजार पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थ तयार करणाऱ्या इच्छुकांना प्रशिक्षण व कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. एक विशेष प्रचार मोहीम चालविली जाणार असून गावोगाव ज्वारी, बाजरी लोकांनी खावी म्हणून पदयात्रा, प्रचार फेऱ्या काढण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
हवामान बदल, दुष्काळी परिस्थिती आदींवर दोन्ही पिके मात करू शकतात. पावसावर अवलंबून असलेल्या प्रदेशात ही पिके चांगली येऊ शकतात. आता केंद्र सरकारने दोन्ही पिकांच्या आधारभूत किमतीत सुमारे ४० ते ६६ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे बाजारात दर चांगले असल्याने या पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढेल. त्यासाठी या पिकांवरच अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. अंगणवाडीमध्ये मुलांना एक दिवस ज्वारीची बिस्किटे, भाकरी, ज्वारीचे पोहे दिले जाणार आहे. पिझ्झा व बर्गरऐवजी ज्वारी व बाजरीची भाकरी महत्त्वाची असल्याचा संदेश सेलेब्रिटींच्या माध्यमातून दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंगणवाडी व शाळामध्ये मुलांच्या माध्यान्ह भोजनात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. तसेच कर्नाटक सरकारने रेशनवर ज्वारी, बाजरी दिली आहे. राज्यातही ती दिली जावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह हे त्यासाठी पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात ज्वारीच्या मालदांडी या वाणाची तसेच बाजरीच्या खासगी कंपन्यांच्या वाणांचे बियाणे शेतकरी पेरणी करतात. आता अधिक चांगल्या जाती संशोधित कराव्यात, असे आवाहन कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप यांनी केले. या वेळी कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ, विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख हे उपस्थित होते. त्यांनी मालदांडीबरोबरच कृषी विद्यपीठाच्या रेवती, सावित्री, वसुधा, अनुराधा, सुचित्रा या जातींचीही लागवड राज्यात केली जात आहे. बाजरीची धनशक्ती, आदिशक्ती, महाशक्ती ही जात लावली जाते. तिला मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाला एक प्रकल्प मंजूर केल्याचे या वेळी सांगण्यात आले. बैठकीत तीन महिने जर महिलांनी धनशक्ती या वाणाच्या बाजरीची भाकरी खाल्ली तर हिमोग्लोबीन वाढते, असा निष्कर्ष वैद्य्कीय महाविद्यालयाच्या एका अहवालात नमूद केल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.
पोषक बाजरी
बाजरी हे पोषक धान्य आहे. त्याची भाकरी हिरव्या रंगाची व गोड लागते. बाजरीत पोषक तत्त्व जास्त आहेत. जस्त व लोहाचे प्रमाण जास्त असून तंतूमय पदार्थ भरपूर आहेत. मधुमेहाच्या वाढत्या आजारामुळे लोक ज्वारी, बाजरीकडे वळत आहेत. दोन्ही पिके ही महाराष्ट्राची पिके आहेत. आता पुन्हा त्याकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. हे भरडधान्य नाही पोषक धान्य आहे. केंद्र सरकारने ज्वारी, बाजरीचा पोषक तृणधान्यात समावेश केल्याने अनेक योजना राबविल्या जातील. त्यामुळे पुन्हा क्षेत्रात वाढ होईल. लोकांच्या आहारात पुन्हा दोन्ही धान्याचा वापर वाढू लागला आहे.
– डॉ. हेमंत पाटील, बाजरी संशोधन केंद्र
