कुरुंदवाड येथे नगरपालिका सभागृहात सोमवारी संभाव्य महापूर उपायोजना बैठकीत, शहरवासीयांनी मागील महापुरातील उणीवांवर बोट ठेवत पालिका प्रशासन,पदाधिकारी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासमोरच पालिका प्रशासनाने केलेल्या तात्पुरत्या उपाययोजनाचा पडदा फाडला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील होते. तर याप्रसंगी  ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर  बैठकीत बोलताना म्हणाले की, शहराला गतवेळच्या महापुराचा फटका पाहून शहरवासीयांना गायरान जमीन खास बाब म्हणून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, महाराष्ट्र व कर्नाटक समन्वयाने पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच, जनावरांच्या छावण्या व अन्न पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

यावेळी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी संभाव्य महापुराच्या तयारीचा आढावा घेतला. नगरसेवक, नागरिकांनी महावितरण, जनावरांच्या छावणी, स्थलांतर,गायरान जमिनी,घरफाळा माफी याबाबत मंत्र्यांसमोर समस्या मांडल्या. शिवसेना शहरप्रमुख राजू आवळे यांनी शहर विकास
आराखडा, प्रलंबित पाणीपुरवठाविषयी लक्षवेधी मागणी केली.