पाच हजार रुग्णांवर उपचार सुरू

बीड : करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतच असून बुधवारी नवीन १ हजार ४७ बाधितांची भर पडली आहे. रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर देखील ताण पडू लागला आहे. बहुतांश रुग्णालये पूर्णत: भरली असून काही ठिकाणी नव्याने कोविड केंद्रांची निर्मिती करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या पाच हजार रुग्णांवर ठिकठिकाणच्या ९० रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

बीड  जिल्ह्यत बुधवारी नवीन १ हजार ४७ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. बीड, अंबाजोगाई, केज आणि आष्टी तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर रुग्ण आढळले आहेत.  रुग्ण वाढीमुळे आरोग्य प्रशासनावर ताण पडू लागला आहे. सध्या ९९ शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये कोविड कक्ष सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णालयांचा देखील समावेश आहे.

शहरासह ग्रामीण भागातही रुग्ण वाढत असल्याने काही रुग्णालयांमध्ये प्राणवायू खाटांची कमतरता भासू लागली आहे.

बाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचाही साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने अडचणींमध्ये वाढ होत आहे.

खासगी रुग्णालयातील रुग्णांना अत्यावश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शन वेळेवर मिळत नसल्याने नातेवाइकांमध्ये प्रशासनाविरुद्ध रोष वाढू लागला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधिंकडूनही इंजेक्शन उपलब्ध व्हावेत यासाठी पाठपुरावा केला जात आहे. बहुतांश रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या कमी पडू लागल्याने प्रशासनाने कोविड केंद्र वाढवण्यास सुरुवात केली आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी ग्रामीण भागातही केंद्र सुरू करण्यात येत आहेत.

रुग्णांच्या नातेवाइकांना शासकीय आणि खासगी रुग्णालयातील उपलब्ध खाटांची माहिती व्हावी म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बीड कोविड पोर्टल नावाचे संकेतस्थळ तयार केले असून त्या माध्यमातून उपलब्ध खाटांची माहिती प्रत्येक तासाला नातेवाइकांना ऑनलाइन पाहता येणार आहे.

रेमडेसिविर इंजेक्शन केवळ औषधांच्या दुकानातच

बीड  जिल्ह्यत रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रात रांगा लागत होत्या. शल्यचिकित्सकांच्या स्वाक्षरीनंतर जिल्हा रुग्णालयातून इंजेक्शन दिले जात होते. दिवसभर उभे राहूनही काही जणांना इंजेक्शन मिळत नव्हते. त्यामुळे नातेवाइकांनी तीन दिवसांपूर्वी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी तोडगा काढत तीन औषधी दुकानांवर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. शल्यचिकित्सकांच्या संमती पत्रानंतरच रुग्णांच्या नातेवाइकांना औषधी दुकानातून इंजेक्शन योग्य दरात उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट  केले.