हिवाळ्यादरम्यान देशात फक्त गंगेचे खोरे, पूवरेत्तर हिमालय तसेच नेपाळ, श्रीलंकेत स्थलांतर करून येणाऱ्या ‘लाँग बिल्ड प्लवर’ या पक्ष्याची अमरावती जिल्ह्य़ातील केकतपूर तलावावर प्रथमच नोंद घेण्यात आली. ‘अमरावती वाइल्ड लाइफ अॅन्ड एन्व्हायर्नमेन्ट कन्झव्र्हेशन सोसायटी’(वेक्स)च्या स्थलांतरित पक्ष्यांच्या परतीच्या प्रवासाच्या अभ्यासादरम्यान या पक्षी संस्थेचे अभ्यासक किरण मोरे, निनाद अभंग, डॉ. जयंत वडदकर, डॉ. गजानन वाघ, गौरव कडू यांना हा पक्षी आढळून आला. हिवाळ्यात नेहमीच भारतभर सर्वत्र येणाऱ्या कंठेरी चिलखा (लिटिल रिंग प्लवर)च्या थव्यात ‘लाँग बिल्ड प्लवर’ पक्षी वेगळा व आकाराने थोडा मोठा आढळून आल्याने त्यावर विशेष लक्ष ठेवून त्याची छायाचित्रे घेण्यात आली. तसेच देशातील पक्षी तज्ज्ञांच्या मदतीने त्याची ओळख पटली.
‘लाँग बिल्ड प्लवर’ हा पक्षी कंठेरी चिलखाप्रमाणेच दिसणारा असून आकाराने त्याच्यापेक्षा ५-६ सेंमी. मोठा आहे. त्याचे पाय कंठेरी चिलखापेक्षा जास्त पिवळे आहेत व त्याच्या डोळ्याभोवताली पिवळी रिंग नसते. डोळ्याचा मागचा भाग हा विटकरी किंवा फिकट काळ्या रंगाचा असून तो कंठेरी चिलखामध्ये गर्द काळा असतो. डोक्यावरची पांढरी भुवई स्पष्ट असून महत्त्वाचे म्हणजे याची चोच गडद काळी व लांब असते.
‘ या पक्ष्याची यापूर्वी महाराष्ट्र व दक्षिण भारतात कुठेही नोंद झाल्याचे संदर्भ न आढळून आल्याने ही नोंद मध्य भारतातील प्रथम नोंद ठरल्याची माहिती संस्थेचे पक्षी अभ्यासक किरण मोरे यांनी दिली. अमरावतीची ‘वेक्स’ ही संस्था हे काम सातत्याने करत असून संस्थेच्या अभ्यासकांनी विदर्भात आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण पक्षी व प्रथम नोंदी घेतल्याची माहिती सचिव डॉ. जयंत वडदकर यांनी दिली.
या पक्ष्याची इंग्रजी भाषेतील ओळख ‘लाँग बिल्ड प्लवर’ अशी असून महाराष्ट्रात यापूर्वी याची नोंद नसल्यामुळे याचे मराठी नाव उपलब्ध नाही. कंठेरी चिलखाप्रमाणेच असल्यामुळे व इंग्रजी नावावरून याचे लांब चोचीचा चिलखा असे समर्पक नाव देण्यात आले असून याचे इंग्रजी नाव ‘कॅराड्रीयस प्लॅसीडस्’ हे आहे.