अहिल्यानगर: गोवंशीय जनावरांमध्ये आढळणारा व दुग्ध उत्पादनावर परिणाम करणारा लम्पी आजाराचा प्रादुर्भाव जिल्ह्यात पुन्हा आढळून आला आहे. जामखेड, नेवासे, राहुरी तालुक्यात काही जनावरे लम्पीबाधित आढळली आहेत. आतापर्यंत सौम्य लक्षणाची १५ जनावरे बाधित आढळली आहेत. आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी लसीकरण मोहीम सुरू असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी दिली.

सुमारे दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात लम्पी आजाराचा उद्रेक झाला होता. हजारो जनावरे बाधित झाली होती. सुमारे साडेचार हजारांवर जनावरे मृत्युमुखी पडली. राज्य सरकारने जाहीर करूनही अनेक पशुपालकांना नुकसानभरपाई मिळाली नाही. प्रादुर्भाव आटोक्यात येण्यासाठी वर्षाचा कालावधी लागला. त्यासाठी जनावरांचा बाजार बंद करणे, जनावरांची वाहतूक बंद करणे, बाहेरील जनावरांना तपासणीनंतरच जिल्ह्यात दाखल करणे आदी स्वरूपाच्या कठोर उपाययोजना कराव्या लागल्या होत्या. हा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचेही त्या वेळी पशुसंवर्धन विभागाने सांगितले होते.

मात्र, आता वर्षभरानंतर जिल्ह्यात पुन्हा लम्पी आजाराने बाधित जनावरे आढळू लागली आहेत. या संदर्भात माहिती देताना नेवासा येथील डॉ. अशोक ढगे यांनी सांगितले, की सलाबतपूर परिसरातील दिघी रस्ता व आजूबाजूच्या गावांमध्ये लम्पी आजाराने बाधित जनावरे आढळली आहेत. लम्पी हा त्वचारोग संसर्गजन्य व विषाणुजन्य आहे.

रोग पसरल्यास दूध उत्पादन कमी होते, जनावरांचे वजन घटते, ताप येतो व काही वेळा मृत्यूदेखील संभवतो. अधिक माहिती देताना पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. पाटील यांनी सांगितले, की या आजाराचा प्रादुर्भाव गोचीड, माशा, डासांमुळे होतो. त्यामुळे गोठा स्वच्छ ठेवणे व गोचीड, माश्यांचा प्रादुर्भाव होणार नाही, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

गेल्या तीन वर्षांपासून लम्पी आजारासाठी मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम राबवली जाते. एकूण ९ लाख ५० हजार ४०० जनावरांपैकी ९ लाख २८ हजार ८०० जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. आणखी २३ हजार डोस इतर ठिकाणांहून मागवून घेण्यात आले आहेत. लम्पी आजाराची सध्या आढळणारी लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत. लसीकरणामुळे बाधित होण्याचे प्रमाणही कमी आहे.