बांधकाम पूर्ण झालेल्या रुग्णालयाचे डिझाइन सदोष
मुंबई- गोवा महामार्गावरील होणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने महाड येथे ट्रॉमा केअर रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयाचे बांधकामही पूर्ण झाले आहे. मात्र साडेतीन कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या या रुग्णालयाचे डिझाइनच चुकले असल्याची बाब समोर आली आहे.
शासनाचे काम आणि दहा वर्षे थांब, अशी एक म्हण प्रचलित आहे. महाडच्या ट्रॉमा केअर सेंटरला भेट दिल्यावर याचाच प्रत्यय येतो. युती सरकारच्या काळात मंजुरी मिळालेल्या महाडचे ट्रॉमा केअर सेंटर जवळपास १५ वर्षांनंतरही पूर्ण होऊ शकलेले नाही. साडेतीन कोटी खर्चून बांधण्यात आलेली इमारत वापराविना पडून आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमारत बांधून पूर्ण झाल्यावर या इमारतीचे डिझाइनच चुकले असल्याची बाब समोर आली आहे.
अपघातात जखमी होणाऱ्या रुग्णाला तातडीचे उपचार मिळावेत आणि गरज भासल्यास या रुग्णावर तात्काळ शस्त्रक्रिया करता यावी, यासाठी या ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. मात्र इमारतीचे बांधकाम करताना शस्त्रक्रिया विभाग पहिल्या मजल्यावर उभारण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या शस्त्रक्रिया विभाग रुग्णांना नेण्यासाठी रॅम्प अथवा लिफ्टची सोयच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उद्या ट्रॉमा केअर सेंटर सुरू केले तर रुग्णांना शस्त्रक्रिया विभागात न्यायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला. महाडमध्ये पावसाळ्यात येणारा पूर लक्षात घेऊन शस्त्रक्रिया विभाग पहिल्या मजल्यावर घेण्यात आला असेलही, मात्र त्या अनुषंगाने इमारतीचे बांधकाम करताना रॅम्प अथवा लिफ्टची सोय करणे गरजेचे होते. मात्र इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत ही चूक लक्षातच आली नाही.
अखेर साडेतीन कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या या नवीन इमारतीत आता लिफ्ट बसवली जाणार आहे. यासाठी २० लाख रुपये नव्याने खर्ची पडणार आहेत. आरोग्य विभागाने हा निधी बांधकाम विभागाकडे वर्गही केला आहे. मात्र बांधकाम विभागाला डिझाइन बनवताना ही चूक लक्षात का आली नाही, हा मोठा संशोधनाचा विषय असणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर दिवसागणिक होणाऱ्या अपघातामध्ये सरासरी दररोज एका माणसाचा मृत्यू होतो. अपघातात जखमी झालेल्यांना थेट मुंबई अथवा पनवेल गाठावे लागते. यात तीन ते चार तास जातात, त्यामुळे जखमी झालेल्याचा बरेचदा मुंबईत जाईतोवर मृत्यू होतो. ही बाब लक्षात घेऊन रायगड आणि रत्नागिरीच्या मध्यावर ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे हे रुग्णालय अपघातग्रस्तांसाठी वरदान ठरणार आहे. ट्रॉमा केअर सेंटरच्या बांधकामात आधी झालेला उशीर आणि आता चुकलेले डिझाइन यामुळे खूप वेळ वाया गेला आहे. आता तातडीने हे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे आणि त्यासाठी आवश्यक तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी महाडकरांनी केली आहे.