हिंगोली: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौरा करून आले आणि अन् राज्यातील मंत्रिमंडळातील फेरबदलाची चेर्चेत कळमनुरीच्या आमदारांनी उडी घेतली आहे. नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये आणि कृतीमुळे चर्चेत असणाऱ्या संतोष बांगर यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे कौतुक तर केले पण मंत्री झालोच तर आरोग्य मंत्री व्हायला आवडेल, असे वक्तव्य पत्रकारांसमाेर केले.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भोवती निर्माण झालेले वादावर आमदार संतोष बांगर म्हणाले, ‘ व्हायरल’ झालेल्या ‘रम्मी’च्या व्हिडिओबद्दल विचारले असता ते म्हणाले, कृषिमंत्री कोकाटे रमी खेळत नव्हते. त्यांचा ‘व्हिडिओ क्रॉप’ केलेला आहे. अलीकडच्या काळात कोणीही काहीही ‘क्रॉप’ करून बनवत आहेत. क्रॉप करून तुम्हाला संतोष बांगरचे मुंडके लावता येईल.’ त्यांचे कौतुक करताना मंत्रिमंडळातील बदलात नंबर लागू शकतो याचाही विचारही आमदार करत आहेत.

बांगर म्हणाले, ‘मला मंत्री होण्याची इच्छा आहे. त्यातही आरोग्य विभागाचे मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळावी. मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळे मंत्रिमंडळामध्ये कोणते फेरबदल होणार आहेत, याची मला माहिती नाही. पण, जर पक्षाने जबाबदारी दिली तर मंत्रिपद कुणाला नको असते. मीसुद्धा एक आमदार म्हणून काम करतोय. आमदार कशा पद्धतीने काम करतोय हे तुम्ही दाखवताच. पण, मंत्री झाल्यानंतर मंत्री कसा असावा हे राज्यातील जनतेला आम्ही दाखवून देऊ’