“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मराठवाड्यामध्ये एकही आमदार आणि खासदार नाही. ज्या पक्षाला भविष्य नाही त्यांच्या मागे का जाता?”, असा सवाल जनतेला करत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. “राज्यात पुन्हा भाजपाचेच सरकार येणार आहे, तुमचं मत वाया घालवू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील लोकही आपल्यालाच मतदान करणार आहेत,” असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. परळी तालुक्यातील विविध कामांच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

“समोरची व्यक्ती निवडणुकीत हरली तरी ती आमदार राहणार आहे. अशावेळी माझं नुकसान का करता? असा सवाल करत आम्हाला दोघांनाही आमदार राहू द्या, असं सूचक वक्तव्य मुंडे यांनी केलं. गेल्या पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध करून देत अन्य अनेक मार्गानी तुमची सेवा केली आहे. यापुढेही मंत्री म्हणून तुमची सेवा करणार आहे. यापुढेही भाजपाचेच सरकार येणार आहे, तुमचं मत वाया घालवू नका,” असं त्या यावेळी म्हणाल्या.

“तुम्ही मलाच साथ द्याल याचा मला विश्वास आहे. भाजपाचे सरकार पुन्हा येणार आहे, यात शंका असण्याचे कारण नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा ज्या जिल्ह्यात एकही आमदार नाही, मराठवाड्यात एकही खासदार नाही, राज्यात सत्ताही नाही, त्यांच्या मागे का जावं? त्यांचे उमेदवार पडणारे आहेत आणि कॉंग्रेसचीही तिच स्थिती आहे,” असंही त्या यावेळी म्हणाल्या.