मालेगावमध्ये एका सराफ व्यावसायिकाला डोळ्यामध्ये मिरची पूड फेकून लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दुकान बंद करुन घरी परतणाऱ्या सराफाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून सहा जणांच्या टोळीने ३५ लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दुचाकी लुटून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री संगमेश्वर भागात घडली.
शहरातील चंदनपूरी गेट भागातील सराफ व्यावसायिक झुंबरलाल बागूल हे दुकान बंद करून दुचाकीने कलेक्टर पट्टा भागातील घराकडे निघाले होते. जाताना त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत सोन्याचे दागिने ठेवले तर चांदीचे दागिने असलेली पिशवी त्यांनी दुचाकीच्या हँडलला अडकवली होती. वाटेत त्यांची दुचाकी एका बोळीजवळ आली असता दोन दुचाकींवरुन अचानक आलेल्या सहा जणांनी डोळ्यात मिरचीची पूड फेकल्याने ते भांबावून गेले. दुचाकी उभी करुन ते डोळे पुसत असताना लुटारुंनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दुचाकी पळवून नेली. चोरट्यांनी त्यांच्याजवळील सुमारे नऊशे ग्रॅम सोने-चांदीचे दागिने असा सुमारे ३५ लाख रुपयांचा ऐवज लुटला.
या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. बागूल यांच्या दुकानापासूनच लुटारू त्यांचा पाठलाग करत असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून चंदनपुरी गेट ते संगमेश्वर मार्गावरील सीसीटीव्हीची तपासणी केली जात आहे.