राज्य सरकारकडून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि भगवद्गीता तर भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्यात येणार आहे. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटलंय. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी यावरून नाराजी व्यक्त केली. तर हिंदू जनजागृती समितीनं मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याला पाठिंबा दर्शवला आहे. दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांनी संविधान नाकारण्यासाठी मनुस्मृती आणली जाते आहे असा आरोप केला आहे.

हे प्रकरण नेमकं काय आहे?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ‘एससीईआरटी’नं राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर असून त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्यात. मात्र, यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटलंय. मुलांना भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. परंतु हा निर्णय सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या वादाचा ठरतो आहे असंच दिसतं आहे.

हे पण वाचा- जितेंद्र आव्हाडांचा आरोप, “महाराष्ट्रात मतदान कमी व्हावं म्हणून निवडणूक आयोगाने…”

जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलं आहे?

“सत्ताधारी पुन्हा एकदा मागच्या दाराने त्यांच्या मनातली गोष्ट पूर्ण करु इच्छित आहेत. आमचं संविधान म्हणजेच मनुस्मृती असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडतं याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांमध्ये मनुस्मृतीचा समावेश. ज्या मनुस्मृतीने या भारताचं वाटोळं केलं, समाजात दुही माजवली, जातीभेद निर्माण केला, चातुर्वणीय व्यवस्था निर्माण केली. स्त्रियांना सगळ्यात घाणेरडी वागणूक देण्याची पद्धत मनुस्मृतीने जन्माला घातली. ती मनुस्मृती परत आणली जाते आहे.” असं आव्हाड म्हणाले.

बहुजनांनो जागे व्हा अन्यथा…

“जे लोक १९५० मध्ये की आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती तेच लोक मनुस्मृती आणू पाहात आहेत. तुम्हाला आणि आम्हाला देशाचं संविधान वाचवायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ मध्ये मनुस्मृतीचं दहन केलं. १९५० मध्ये संविधान जन्माला घातलं. आज मनुस्मृती पुन्हा येते आहे, बहुजनांनी जागं झालं पाहिजे नाहीतर पाच हजार वर्षे तुमच्या वाड-वडिलांना भोगावं लागलं ते तुम्हाला आणि आम्हाला भोगावं लागेल. त्यासाठी आपण महाडला जातो आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करुन आपण मनुस्मृतीचं दहन करतो आहोत.” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिल्याप्रमाणे महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीची होळी केली होती. त्याच ठिकाणी जितेंद्र आव्हाड हे जाणार असून या ठिकाणी ते देखील मनुस्मृतीच्या प्रतींची होळी करून सरकारचा निषेध करणार आहेत. सरकारच्या या निर्णया विरोधात एकत्र येण्याचे आवाहन देखील आव्हाड यांनी केले आहे.