धवल कुलकर्णी 

जगभरात थैमान घालणाऱ्या corona व्हायरसच्या भीतीमुळे मास्क आणि हँड सॅनेटायझरची मागणी वाढते आहे. त्यामुळे या दोन्हीच्या किंमती वाढत आहेत. या दोन्ही वस्तूंचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये झाला आहे. तरीही या दोन वस्तूंच्या किंमती वाढत आहेत अशा तक्रारी येत आहेत. या दोन्हीचा बेकायदेशीर साठा करणाऱ्या साठेबाजांवर कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने अवाच्या सवा भावाने मास्क विकणाऱ्या आणि त्यांचा साठा करणार्‍यांवर वचक ठेवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले की सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येत्या पंधरवड्यामध्ये सतत बेकायदेशीरपणे स्टॉक करणाऱ्या मंडळीवर आणि चढ्या दराने या वस्तू विकणाऱ्या दुकानदारांवर नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

आपल्याकडे आधी वापरण्यात आलेले मास्क पुन्हा धुऊन इस्त्री करून विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या बाबतच्या तक्रारी आल्या असून दोन-तीन ठिकाणी असे प्रकार पकडण्यात आले आहेत. मात्र लोकांनीसुद्धा प्रशासनाला सहकार्य करून अशा  घटनांबाबतची माहिती आम्हाला द्यावी असे आवाहन शिंगणे यांनी केले.

याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करता येईल. महत्वाचे म्हणजे करोनाच्या भीतीमुळे मागणी वाढली असताना प्रादुर्भाव टाळण्यासाठी साध्या साबणाने सुद्धा हात धुतला तरी चालते अशी माहिती त्यांनी दिली.