मंगळवारी झालेल्या वादळी पावसात जिल्ह्यात झाडे कोसळून शेकडो वीज खांब जमीनदोस्त झाले तर गिरणारे येथे वीज उपकेंद्राचेही नुकसान झाले. मागील काही दिवसात वादळी पावसाने महावितरणचे कोटय़वधींचे नुकसान झाले आहे. कोलमडलेली व्यवस्था उभी करण्यासाठी महावितरणकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक भागातील वीज पुरवठा बुधवारी सायंकाळपर्यंत पूर्ववत होऊ शकला नाही.
मागील सहा ते सात दिवसांपासून जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. या कालावधीत शहर व ग्रामीण भागात शेकडो झाडे कोसळली. त्यामुळे उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांसह वीज खाबांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यापूर्वी शहरात १३९ वीज खांब कोसळले होते. विद्युत रोहित्राचे मोठे नुकसान झाले. त्यांची दुरुस्ती पूर्णत्वास जात नाही तोच, मंगळवारी पुन्हा वादळी पावसाने तडाखा दिला. देवळाली कॅम्प, सातपूर, गंगापूर, सामनगाव, गिरणारे, भगूर, शिंदे-पळसे आदी भागात झाडे कोसळली. त्यात शेकडो वीज खांब पुन्हा जमीनदोस्त झाले. गिरणारे उपकेंद्रात महाकाय निलगिरीचे झाड पडल्याने लाखोंचे नुकसान झाले. या ठिकाणी ‘ब्रेकर’ व अन्य भाग तुटल्याने बरीच वाताहत झाली. वीज कडाडल्याने अनेक ठिकाणी वाहिन्या नादुरुस्त झाल्या. मुख्य अभियंता के. व्ही. अजनाळकर, अधीक्षक अभियंता प्रशांत नेवासकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शहरासह ग्रामीण भागात खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके कामाला लागली. वीज तारा, उन्मळून पडलेले खांब आणि कंडक्टर बदलविण्याची कामे एकाच वेळी हाती घेण्यात आली. रात्रीच्या अंधारात ही कामे सुरू होती. टप्प्या टप्प्याने शहरातील काही भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. गिरणारे, देवळालीसह ज्या भागात सर्वाधिक नुकसान झाले, तेथील दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत. ग्रामीण भागातील वीज पुरवठा बुधवारी सायंकाळपर्यंत सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु होते.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jun 2014 रोजी प्रकाशित
वादळी पावसाने महावितरणचे कोटय़वधींचे नुकसान
मंगळवारी झालेल्या वादळी पावसात जिल्ह्यात झाडे कोसळून शेकडो वीज खांब जमीनदोस्त झाले तर गिरणारे येथे वीज उपकेंद्राचेही नुकसान झाले.
First published on: 05-06-2014 at 02:58 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive rain storm hits mahavitaran