mesh fence at kaas plateau started to remove after collector order zws 70 | Loksatta

कास पठाराला घातलेले कुंपण काढण्यास सुरुवात

पठाराच्या संरक्षणाच्या हेतूने या संपूर्ण भागास काही वर्षांपूर्वी एक भले मोठे कुंपण घालण्यात आले.

कास पठाराला घातलेले कुंपण काढण्यास सुरुवात
कुंपण काढल्यामुळे वन्य प्राणी व गुरांच्या वावरासाठी हा परिसर मोकळा होईल.

वाई: जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठराला घातलेले भलेमोठे कुंपण काढण्यास सुरुवात केली आहे. या कुंपणामुळे निसर्गसाखळीत अडथळा ठरत असून त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पठरावरील फुलांचा बहर कमी झाल्याची टीका निसर्गप्रेमींकडून होत होती. अखेर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी याबाबतचे आदेश दिल्यावर आज हे जाळीचे कुंपण काढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कास पठारावरील वन्य जीवांसह पाळीव प्राण्यांचा वावर, चराई ही विनाअडथळा होणार आहे.

सातारा जिल्ह्यातील कास पठार हे पावसाळय़ात उमलणाऱ्या रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे. या पठाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला. पठाराच्या संरक्षणाच्या हेतूने या संपूर्ण भागास काही वर्षांपूर्वी एक भले मोठे कुंपण घालण्यात आले. परंतु हे कुंपण घातल्यावर या भागातून होणारी अन्य वन्य प्राण्यांची हालचाल, पाळीव प्राण्यांची चराई बंद झाली. यातून अन्य वनस्पतींची वाढ झाल्यामुळे पठाराचे वैशिष्टय़ असलेल्या रानफुलांचा बहर कमी झाला आहे. हे कुंपण निसर्गसाखळीत अडथळा ठरत असून त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पठारावरील फुलांचा बहर कमी झाल्याची टीका निसर्गप्रेमींकडून होत होती.

या पार्श्वभूमीवर हे कुंपण काढण्याचे आदेश आणि काम आज सुरू झाले. जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक आज कास पठारावर आले. सोबत कास समितीचे कर्मचारी व वन विभागाचे कर्मचारी घेऊन ठीक दहा वाजता कुंपण काढण्यास सुरुवात झाली.

मागील काही वर्षांत कास पठारावरील फुलांचा बहर मोठय़ा प्रमाणात कमी झाला होता. याचा अभ्यास करून व तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर येथील जाळी काढण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे कास पठारावरील फुलांच्यार बहरावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. कास समिती वनविभाग मार्फत जाळी काढण्याचे काम सुरू केले असून कास पठारावर यापुढे असामाजिक तत्त्वांचा वावर वाढू नये यासाठी समितीमार्फत सुरक्षा वाढविली जाईल. कुंपण काढल्यामुळे वन्य प्राणी व गुरांच्या वावरासाठी हा परिसर मोकळा होईल.

रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी,सातारा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 05:29 IST
Next Story
केंद्राने देशभर समान नागरी कायदा लागू करावा!; शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत : राज