औरंगाबाद येथील दुग्धशाळेतील अतिरिक्त कार्यभार असलेले प्रादेशिक दुग्धविकास अधिकारी शंकर जोतिबा सावळकर यांना हस्तकाकरवी ९० हजाराची लाच घेताना शनिवारी रात्री अटक करण्यात आली.
लातूर जिल्हय़ातील उदगीर येथील दुग्धशाळेत प्रयोगशाळा सहायक पदावर काम करणारे राहुल रुब्दे यांना त्याच पदावर कायम ठेवण्यासाठी २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. राहुल रुब्दे यांना चुकीच्या पद्धतीने पदोन्नती देण्यात आल्याच्या कारणावरून ही लाच मागण्यात आली होती. एक लाख रुपयांवर तडजोड होऊन ते पैसे गंगाखेड दुग्ध शीतकरण केंद्रातील रसायनतज्ज्ञ सुशील बलसुरे यांना लातूर येथे रोखीने देण्याचे सावळकर याने सांगितले होते. राहुल रुब्दे यांनी शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास लातूर येथे हॉटेल साईमध्ये सुशील बलसुरे यांना ९० हजार रुपये देताना लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर सुशील बलसुरे यांना सावळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यास सांगण्यात आले. सावळकर यांनी बलसुरे यांना पैसे घेऊन अंबाजोगाई येथील बसस्थानकावर येण्यास सांगितले. त्या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रात्री साडेदहाच्या सुमारास शंकर सावळकर यांना अटक केली. रविवारी सकाळी त्यांच्या घराची झडतीही घेतली असल्याचे समजते.