सेनगाव येथील ८ वर्षं वयाच्या अल्पवयीन मुलीला कुल्फी देण्यासाठी वडिलांनी बोलावले असल्याच्या नावाखाली अज्ञात व्यक्तींनी फूस लावून वीटभट्टीकडे नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सेनगाव येथील मोलमजुरी करून प्रपंच चालविणाऱ्या फिर्यादी महिलेस एक ११ वर्षांचा मुलगा व दुसरीत शिकणारी ८ वषार्ंची मुलगी आहे. शुक्रवारी सकाळी मुलीचे वडील कामानिमित्त घराबाहेर गेले. आई घरगुती काम करत होती. सायंकाळी पाचच्या सुमारास मुलीने कुल्फी खाण्यासाठी आईकडे पशांची मागणी केली असता आईने त्या मुलीला १५ रुपये दिले. पसे घेऊन मुलगी एमएसईबी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील उभ्या असलेल्या कुल्फीविक्रेत्याकडून कुल्फी घेऊन परत येताना त्या मुलीला तुझे वडील हॉटेलमध्ये बसले असून तुला बोलावल्याची फूस लावून अज्ञात व्यक्तींनी तिला पळवून गेले.
मुलगी कुल्फी घेऊन परत आली नाही म्हणून तिची आई आपल्या मुलीचा शोध घेऊ लागली. दरम्यान, एका ओळखीच्या व्यक्तीने त्या मुलीस घरी आणले असता मुलगी रडत होती. तिच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. मुलीला घेऊन तिच्या आईने अगोदर खासगी रुग्णालय गाठले व नंतर शासकीय रुग्णालयात नेले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे तपासात आढळून आले. त्यानंतर अल्पवयीन मुलीस पुढील औषध उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर औषधोपचार सुरू आहेत. सेनगाव पोलिसात फिर्यादी आईच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील नाईक करीत आहेत.