आमदार संग्राम जगताप यांनी अखेर बुधवारी महापौरपदाचा राजीनामा दिला. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी हे राजीनामापत्र सादर केले. सभेतच त्यांच्या निरोपाचाही औपचारिक कार्यक्रम झाला. सभेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी गेल्या दीड वर्षांच्या कारकीर्दीबद्दल आपण समाधानी आहोत, असे सांगितले.
विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून जगताप यांच्या महापौरपदाच्या राजीनाम्याची प्रतीक्षा होती. राष्ट्रवादीतच ‘एक व्यक्ती एक पद’ या न्यायाने त्यांनी महापौरपदाचा राजीनामा द्यावा अशा हालचाली सुरू होत्या. विविध कारणांनी हा बदल चार महिने लांबणीवर पडला. अखेर बुधवारी महापौरपदावरून जगताप पायउतार झाले. नव्या महापौरपदासाठी राष्ट्रवादीत पक्षाचे माजी आमदार अभिषेक कळमकर यांच्या नावाची चर्चा असून, राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेस तेही उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना जगताप म्हणाले, पूर्वी अडीच वर्षे आणि आता दीड वर्षे अशी दोनदा महापौरपदाची संधी मिळाली. या दीड वर्षांतील कारभाराबद्दल आपण समाधानी आहोत. दुसऱ्या वेळी ही संधी मिळाली तेव्हा महापौरपद स्वीकारताना मनपासमोर अनेक अडचणी होत्या. पूर्वीच्या कारकीर्दीतच अनेक योजनांसाठी मोठय़ा प्रमाणावर निधी आणला होता. मात्र माझी कारकीर्द संपल्यानंतर ही कामे रेंगाळली. त्यातील अनेक विकासकामांना दुसऱ्या इनिंगमध्ये चालना देण्याचा संधी मिळली. प्राधान्याने तीच कामे हाती घेतली होती. विशेषत: कोठी रस्ता, बालिकाश्रम रस्ता, पाणीपुरवठा योजना फेज-२, शहर बस वाहतूक या कामांना पुन्हा वेग देता आला, ही मोठी उपलब्धी आहे. मनपा कर्मचाऱ्यांचे थकीत पगार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन, मुळा धरणावरील पाणी योजनेचे थकीत बिल आदी मोठी देयकेही या काळात अदा करता आली, ही मोठीच जमेची बाजू आहे.
महापौरपदाचा पूर्वीच्या कार्यकाळातील अनुभव आपल्या कामी आला, असे जगताप यांनी सांगितले. ते म्हणाले, मनपात राष्ट्रवादीची एकटय़ाची सत्ता नव्हती. काँग्रेस, मनसे व अपक्षही या सत्तेत सहभागी होते. या दीड वर्षांत या मित्रपक्षांचेही उत्तम सहकार्य लाभले. पूर्वी रेंगाळलेली अनेक कामे आता अंतिम टप्प्यात आहेत, याचे समाधान मोठे आहे. महापौर नसलो तरी आमदार या नात्याने यापुढेही शहराच्या विकासासाठी आपण बांधील आहोत. शहरातील विविध प्रलंबित कामांबाबत राज्य सरकार व विधिमंडळाच्या स्तरावर कायम पाठपुरावा करू, असे ते म्हणाले.
महापौरपदाचा राजीनामा हा पक्षाचा निर्णय होता, त्याला आपली कुठलीच हरकत नव्हती. आताही पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच होईल, असा दावा करतानाच त्याचे नाव सांगण्याचे मात्र जगताप यांनी टाळले. पक्षाच्या आदेशानुसार हा निर्णय होईल, असे ते म्हणाले. किशोर डागवाले, अभय आगरकर, कैलास गिरवले, सभागृहनेते कुमार वाळके, स्वप्नील शिंदे, दीप चव्हाण, नजीर अहमद, महिला समितीच्या सभापती नसीम शेख यांनी सर्वसाधारण सभेत जगताप यांच्या कार्याचा गौरव केला.
नगरसेवकपदी कायम
जगताप यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला असला तरी नगरसेवकपदी ते कायम आहेत. हा राजीनामा त्यांनी दिलेला नाही. त्याबाबत त्यांनी निश्चित भाष्यही केले नाही, मात्र महापौरपदाची निवडणूक होईपर्यंत ते तसा निर्णय घेणार नाहीत, हे या पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले.
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2015 रोजी प्रकाशित
आ. जगताप महापौरपदावरून पायउतार
आमदार संग्राम जगताप यांनी अखेर बुधवारी महापौरपदाचा राजीनामा दिला. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी हे राजीनामापत्र सादर केले.

First published on: 28-05-2015 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla sangram jagatap resigned from the post of mayor