लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना पत्नी, मुलगी, जावई, नातू, सारा परिवार सोबत आहे, पण आई नाही. मामे भावाकडून भेटण्यासाठी निरोप दिला होता, पण शक्य झाले नाही. मी सध्या खूप आघात, वेदना आणि दु:ख सहन करीत आहे, असे सांगत खासदार गोपीनाथ मुंडे यांचा कंठ दाटून आला व त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तेव्हा सभागृहही स्तब्ध झाले. कुटुंबातील राजकीय कलहामुळे आईची भेट होत नसल्याने मनात होतअसलेली घालमेल पहिल्यांदाच मुंडे यांनी जाहीरपणे व्यक्त केली. कार्यकर्त्यांचे अश्रू पुसणारा कणखर नेता मनातल्या दुखाने व्याकूळ झाल्याचा पाहून कार्यकत्रेही गहिवरून गेले.
बीड मतदारसंघातून महायुतीतर्फे मुंडे यांनी मंगळवारी अर्ज दाखल केल्यानंतर यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या वेळी ते म्हणाले, की माझा जन्म सामान्य कुटुंबात झाला. वयाच्या २५ वर्षांपर्यंत हलाखीचे जीवन गेले. सामान्य माणसासाठी राजकारणात संघर्ष केला. ३७ वर्षांच्या राजकीय जीवनात राज्यभरात अनेक कार्यकत्रे उभे केले. अनेक जण सोडून गेले, परत आले. पण कोणाबद्दल आपल्या मनात राग व द्वेष नसतो. मात्र, रक्ताचेच नाते दुरावले. माझे मीठच अळणी आहे. काय करणार?
वडील ग्रामपंचायत सदस्यही नव्हते. अशा कुटुंबातून आलो. आज वडील असते तर बरे वाटले असते. आज उमेदवारीअर्ज भरताना सारे कुटुंब सोबत आहे, पण आई नाही. तिचा आशीर्वाद घेण्यासाठी मामे भावामार्फत निरोप दिला होता, पण ते शक्य झाले नाही. राजकारणातील संघर्षशील व कणखर नेता म्हणून मुंडे नेहमीच कार्यकर्त्यांसमोर असतात. कार्यकर्त्यांचे दुख जाणून अश्रू पुसतात. मात्र, पहिल्यांदाच त्यांच्या मनातील भावना अनावर झाल्याचे दिसून आले.
कौटुंबिक कलहामुळे मागील दोन वर्षांपासून मुंडे व त्यांची आई यांची भेट होऊ शकली नाही. मुंडेंचे ज्येष्ठ बंधू पंडितराव व पुतणे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मुंडे कुटुंबातील कलह राज्यभर गाजला. वयोवृद्ध िलबाबाई मुंडे दुसरा मुलगा पंडितराव यांच्याकडे राहतात. राजकारणातून दोघा भावांमध्ये वितुष्ट आल्यामुळे ते एकमेकांच्या घरी जात नाहीत. तब्बल वर्षांनंतर पहिल्यांदाच खासदार मुंडे यांनी मनातील दु:ख जाहीरपणे व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2014 रोजी प्रकाशित
खा. मुंडेंच्या भावनांचा बांध फुटतो तेव्हा..!
लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना पत्नी, मुलगी, जावई, नातू, सारा परिवार सोबत आहे, पण आई नाही. मामे भावाकडून भेटण्यासाठी निरोप दिला होता, पण शक्य झाले नाही. असे सांगत खासदार गोपीनाथ मुंडे यांचा कंठ दाटून आला व त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

First published on: 26-03-2014 at 01:56 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp gopinath munde feeling mother