अहिल्यानगर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांच्या निर्देशानंतर ठेकेदाराने नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू केल्याने, तसेच हे काम कालबद्ध पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने खासदार नीलेश लंके यांनी काल, शुक्रवारपासून सुरू केलेले उपोषण आज, शनिवारी सायंकाळी मागे घेतले.

माजी आमदार दादा कळमकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांच्या हस्ते त्यांनी उपोषण मागे घेतले. नगर-मनमाड रस्त्याच्या कामाचा अडीच महिन्यांपूर्वी कार्यारंभ आदेश देऊनही हे काम सुरू करण्यात आले नाही. जीवघेणा ठरत असलेल्या या रस्त्याचे काम तातडीने सुरू करा, या मागणीसाठी खासदार लंके यांनी कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

खासदार लंके यांना दिलेल्या लेखी आश्वासनात नमूद केले, की निर्देशानुसार ठेकेदाराने आज राहुरी कारखाना, शनिशिंगणापूर फाटा व देहरे येथे काम सुरू केले आहे. कणगर व पिंपरी निर्मळ येथे प्लॅण्ट उभारणी, यंत्रसामग्री व लॅबोरेटरी उभारली आहे. खासदार लंके यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू झाले का, याची पडताळणी केली. त्यानंतर लंके यांनी आंदोलन मागे घेतले. ठेकेदाराने काम वेळेत पूर्ण न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. वेळेत काम पूर्ण न झाल्यास ठेकेदारास मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे लेखी आश्वासनात नमूद करण्यात आले आहे.