रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथील तीव्र उतारावर नियंत्रण सुटल्याने ट्रकला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रेलरने चार दुचाकी व दोन कारला भीषण धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. या सर्वांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जयगड येथून कोल्हापूरकडे जाणार्या ट्रेलर (क्रमांक केए २० सी १८४३) ने दोन कार व चार मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील विद्यार्थी शिवम विरेंद्र गोताड (वय १९) हा झरेवाडी येथे आपल्या घरी जात असताना या अपघातात ठार झाला. उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
शिवम विरेंद्र गोताड (वय १९) हा मृत विद्यार्थी मोटार सायकल वरुन त्याच्या मागे बसलेला निशान सुरेश कळंबटे (वय १९) दोघेही रा. झरेवाडी, रत्नागिरी याच्या बरोबर जात होता. या अपघातात निशान गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा हायस्कूल समोरील तिव्र उतारात घडला. शिवम गोताड आणि निशांत कळंबटे हे दोघे रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) येथे शिक्षण घेत आहेत. बुधवारी सायंकाळी दोघेही दुचाकीवरून झरेवाडीकडे जात होते. हातखंबा येथील हायस्कूलसमोरील तीव्र उतारावर मागाहून आलेल्या ट्रेलर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने गोताड याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये गोताड जागीच ठार झाला. त्याच्या मागे बसलेल्या निशांत याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनास्थळावरिल उपस्थितांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. एवढेच नव्हे तर गोंधळलेल्या ट्रेलर चालकाने पुढे आणखी ३ ते ४ दुचाकींना धडक देत २ कारलाही धडक दिली. यामध्ये ४ जण किरकोळ जखमी झाले आहे. या अपघाता नंतर नाणीज येथील रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेने या अपघातातील जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तसेच या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहचून त्यांनी वाहतूक सुरळीत केली. महामार्गावर एक मार्गी वाहतूक सुरु केली असून अधिक तपास ग्रामीण पोलीस अमंलदार करत आहेत.