‘महाराष्ट्र गुजरात का बडा भाई है’ असे आपल्या भाषणात आवर्जून सांगणाऱ्या गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र पोलिसांवर दाखवलेला अविश्वास सध्या पोलीस दलात चच्रेचा विषय बनला आहे. मोदी यांची उद्या (रविवारी) येथील गुरूगोिवदसिंग स्टेडियमवर जाहीर सभा होणार आहे. दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या मोदी यांच्यासाठी शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. मोदींना राष्ट्रीय सुरक्षा ग्रुपची (एनएसजी) सुरक्षा आहे.
विमानतळावर आगमन झाल्यापासून ते पुन्हा विमानात बसेपर्यंत त्यांना तीन सुरक्षा यंत्रणांचा फेरा असणार आहे. वास्तविक, ज्यांना ‘एनएसजी’ची सुरक्षा असते अशा व्यक्तीभोवती पहिले वर्तुळ (फर्स्ट सर्कल) एनएसजीचे, तर दुसरे वर्तुळ त्या-त्या राज्यातील विशेष सुरक्षा विभागाचे (स्थानिक पोलिसांच्या सहकार्यासह) असते. मोदी यांच्याबाबत मात्र यात बदल केला आहे.
‘एनएसजी’चे पहिले वर्तुळ झाल्यानंतर दुसऱ्या वर्तुळासाठी मोदींची स्थानिक पोलिसांना पसंती नाही. दुसऱ्या वर्तुळासाठी गुजरातमधील ‘स्पेशल ऑपरेशन गुजरात फोर्स’च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तिसऱ्या वर्तुळासाठी महाराष्ट्र पोलीस, म्हणजे स्थानिक पोलिसांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना धोका आहे, अशांसाठी ‘एनएसजी’ व त्यानंतर स्थानिक पोलिसांची गरज असते. मोदी मात्र त्याला अपवाद ठरले आहेत.
भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ‘एनएसजी’, गुजरात पोलीस, स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त मोदींसाठी खासगी सुरक्षा रक्षकही दाखल झाले आहेत. देशभरातील ज्या राज्यात गुप्तचर यंत्रणा उत्तमरीत्या कार्यरत आहे किंबहुना ज्या राज्यातील पोलिसांची कामगिरी चांगली व सरस आहे, अशांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक गुजरातच्या वरचा आहे. वेगवेगळे दहशतवादी हल्ले व गंभीर गुन्ह्यांचा उलगडा महाराष्ट्र पोलिसांनी मोठय़ा शिताफीने केला आहे. असे असताना त्यांच्यावर अविश्वास दाखवण्याची कृती अनेकांना खटकली आहे.
मोदींच्या उद्या होणाऱ्या सभेच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक पोलिसांना गुजरात पोलिसांच्या दादागिरीचा प्रत्यय आला. मोदींच्या सभेचा दौरा आल्यापासून डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावणाऱ्या स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुजरात पोलिसांची कृती खटकली. या बाबत कोणतीही जाहीर प्रतिक्रिया देण्यात आली नसली, तरी नाराजी मात्र काही अधिकारी लपवू शकले नाहीत. मोदी यांच्या सभेच्या पाश्र्वभूमीवर अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. स्टेडियम परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. सर्व संवेदनशील ठिकाणी पोलिसांची विशेष नजर असणार आहे.
स्थानिक पोलिसांसह िहगोली, परभणी येथून अतिरिक्त फौजफाटा दाखल झाला आहे. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जगन्नाथन, पोलीस अधीक्षक परमजितसिंग दहिया, सहायक अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक तानाजी चिखले यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. सभेच्या ठिकाणी तीन प्रवेशद्वार आहेत. भव्य स्टेज उभारले आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी, तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आहे. एनएसजीच्या सूचनेनुसार सर्वच प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
सर्व यंत्रणा सुरक्षा व्यवस्थेत असताना, खबरदारीचा उपाय म्हणून दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी-कर्मचारी स्वतंत्र गस्त घालणार आहेत. विमानतळ, सर्व प्रवेशद्वार व मुख्य रस्त्यांवर एटीएसचे कर्मचारी तनात केले आहेत. नांदेड एटीएसचे प्रमुख बेद्रे यांनीही सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
सकाळी ११ वाजता मोदींची सभा होणार असून भाजपची मराठवाडय़ातील ही पहिलीच जाहीर सभा आहे. खासदार गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, पक्षाचे उमेदवार डी. बी. पाटील यांच्यासह अनेक नेते-पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत.