भाजप-शिवसेना युती सरकारचा, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांचा निषेध करणारी फलके, पोस्टर्स व बॅनर्स नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिदुर्गम व दुर्गम भागात लावली आहेत. राज्य सरकार भांडवलदारांचे असून मुख्यमंत्री भांडवलदारांचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध असो, अशा आशयाच्या या फलकांमुळे खळबळ उडाली आहे.
नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत सध्या आदिवासींचे हत्यासत्र पुन्हा आरंभले आहे. त्यामुळे गडचिरोली पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असतानाच गेल्या दोन दिवसांत आसरअल्ली, सोमनपल्ली व धानोरा तालुक्यांतील काही गावांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या निषेधाचे पोस्टर्स, बॅनर्स ठिकठिकाणी झळकले आहेत. सोमवार, ९ फेब्रुवारीला दिल्लीत गृहमंत्री राजनाथसिंह यांनी देशातील सर्व नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन संरक्षणाच्या दृष्टीने विविध मुद्दय़ांवर चर्चा केली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सोमनपल्ली येथे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून तेथेही निषेधाचे बॅनर लावले होते. याला काही शाळकरी विद्यार्थ्यांनी हात लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात बॉम्ब किंवा अन्य काही स्फोटके असतील, या भीतीने तेथील एका इसमाने त्यांना तेथून बाहेर जाण्यास सांगितले. काही पोस्टर्स पोलिसांनी जप्तही केलेली आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी पवार यांचा संपर्क होऊ शकला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 15th Feb 2015 रोजी प्रकाशित
नक्षल्यांचे गडचिरोली जिल्ह्य़ात सरकारविरोधी फलक
भाजप-शिवसेना युती सरकारचा, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांचा निषेध करणारी फलके

First published on: 15-02-2015 at 03:47 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxal displays anti govt posters govt in gadchiroli