रविवारी नगरमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचा आयोजित केलेला एकत्रित मेळावा म्हणजे नगर दक्षिण मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकतील. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आघाडीचा हा राज्यातील पहिलाच एकत्रित मेळावा होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यास काँग्रेसच्या दोन्ही मंत्र्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
जिल्हय़ातील नगर दक्षिण मतदारसंघाची जागा, काँग्रेस आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आली आहे. कालच पक्षाने राजळे यांची उमेदवारी जाहीर केली. या पाश्र्वभूमीवर जाणीवपूर्वक दोन्ही काँग्रेसचा एकत्रित मेळावा आयोजित केला गेला आहे. पूर्वी हा मेळावा दुपारी एक वाजता शिल्पा गार्डनमध्ये आयोजित करण्यात आला होता. परंतु आता ठिकाण बदलून तो मनमाड रस्त्यावरील हुंडेकरी लॉन्स येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सरचिटणीस सोमनाथ धूत यांनी दिली.
राजळे यांची उमेदवारी जाहीर होताच तातडीने नगरला मेळावा आयोजित करण्यामागेही अनेक कांगोरे आहेत. राजळे यांच्या उमेदवारीस पक्षातीलच अनेकांनी विरोध केला होता. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा विरोध डावलून राजळे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पक्षांतर्गत असंतोष धुमसतो आहे. हा असंतोष शांत करण्यासाठीच नगरच्या मेळाव्यास प्रथम प्राधान्य दिले गेले आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीच्या नगर दक्षिणमधील प्रमुख नेत्यांची बैठक घेणार आहेत. बैठकीत असंतुष्टांना समज दिली जाणार की त्यांची नाराजी शमवण्याचा प्रयत्न होणार याबद्दल पक्षात चर्चा होत आहे. मात्र विरोध डावलून उमेदवारी जाहीर केल्याने समज देण्याचाच प्रकार घडेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
मेळाव्यास काँग्रेसचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दोघे पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहतात का, याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात आहे. मेळावा रविवारी होत असला तरी शुक्रवारी सायंकाळपर्यंत मतदारसंघातील अनेक प्रमुख काँग्रेस नेत्यांना मेळाव्याचे निरोप मिळालेले नाहीत. उमेदवारी राष्ट्रवादीची असल्याने त्यांच्याकडूनच निरोप पोहोच होणे आवश्यक असल्याकडे काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.
मेळाव्यास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री मधुकर पिचड आदी उपस्थित राहणार आहेत. प्रचाराच्या या शुभारंभानिमित्त शक्तिप्रदर्शन घडवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राजळे समर्थकांकडून मिळाली.