शहरात गेल्या काही दिवसांत डेंग्यूने पुन्हा मान वर केली. मागील आठवडय़ात विविध भागांत २६ संशयित रुग्ण आढळून आल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मात्र केडगाव किंवा अन्य भागात डेंग्यू किंवा विषमज्वराची (टायफाईड) साथ नसल्याचा निर्वाळाही मनपाच्या सूत्रांनी दिला आहे.
मनपाच्या आरोग्य विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहराच्या विविध भागात मागील आठवडय़ात डेंग्यूचे २६ संशयित रुग्ण आढळून आले. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याचे अहवाल अद्यापि आलेले नाहीत. मनपाच्या आरोग्य विभागाने गेल्या आठवडय़ात शहरातील ९ हजार ४७ घरे व ४३ हजार ५३८ लोकांचे सर्वेक्षण केले. यातील २५५ घरांमध्ये धूरफवारणीही करण्यात आली. शहरातील कचऱ्याचे ३५५ कंटेनर तपासण्यात आले असून त्यातील १३ कंटेनर दूषित आढळले.
शहरात डेंग्यूच्या २६ संशयित रुग्णांसह ३२ तापसदृश व विषमज्वराचे १० रुग्ण आढळून आले. केडगाव भागात त्यातील २ डेंग्यूचे संशयित, ७ तापसदृश व ३ विषमज्वराचे रुग्ण आहेत. डेंग्यूचे ६ संशयित व अन्य १० रुग्णांवर विविध रुग्णांलयांमध्ये उपचार सुरू असून उर्वरित रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. मात्र केडगाव किंवा अन्य भागातही कोणत्याच आजाराची साथ नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे. डेंग्यूचा डास हा आजार साठवलेल्या स्वच्छ व उघडय़ावरील पाण्यावर निर्माण होतो, तर विषमज्वर दूषित अन्न व पाण्याने होतो. त्यादृष्टीने नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच शहरातील खासगी रुग्णालये व डॉक्टरांनी अशा रुग्णांची माहिती तातडीने मनपाच्या आरोग्य विभागाला कळवावी, असे आवाहनही मनपाने केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Oct 2015 रोजी प्रकाशित
डेंग्यू, विषमज्वराची साथ नसल्याचा निर्वाळा
मागील आठवडय़ात विविध भागांत २६ संशयित रुग्ण आढळून आल्याची माहिती
Written by अपर्णा देगावकर

First published on: 08-10-2015 at 03:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No dengue typhoid epidemic in city