गडचिरोली जिल्ह्य़ाच्या धानोरा तालुक्यातील बेलगावला राहणारे काँग्रेसचे कार्यकर्ते जितेंद्रशाह मडावी यांची नक्षलवाद्यांनी पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या केली. गेल्या आठवडाभरातील ही तिसरी राजकीय हत्या आहे. यामुळे गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात कमालीची दहशत निर्माण झाली आहे.
जितेंद्र मडावी (४०) घरात झोपलेले असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास सुमारे ४० नक्षलवादी त्यांच्या घरात शिरले व त्यांना झोपेतून उठवून गोळय़ा घालून त्यांना ठार केले. जितेंद्र मडावी हे या परिसरात महाराजा म्हणून ओळखले जात होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. संपूर्ण गावकऱ्यांच्या समक्ष ही हत्या केल्यानंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळी एक पत्रक ठेवले. त्यात जितेंद्र मडावींचा पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षकांशी थेट संबंध असून ते चळवळीच्या हालचाली पोलिसांना कळवत होते. त्यामुळे त्यांना ठार मारण्यात आले, असे यात  म्हटले आहे.
गेल्या आठवडाभरात नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत केलेली ही तिसरी राजकीय हत्या आहे. या आधी भामरागड तालुक्यात काँग्रेसचे पांडू तलांडी यांना, तर एटापल्ली तालुक्यात राष्ट्रवादीचे घिसू मट्टामी यांना नक्षलवाद्यांनी ठार केले होते. नक्षलवाद्यांच्या या राजकीय हत्यासत्रामुळे गडचिरोलीत कमालीची दहशत पसरली आहे. दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत नक्षलवाद्यांनी आज एटापल्ली तालुक्यातील तोडसा गावाजवळ रस्ता बांधणीच्या कामावर असलेला एक रोड रोलर पेटवून दिला. रस्त्याचे बांधकाम तातडीने थांबवण्यात यावे, असे पत्रक नक्षलवाद्यांनी घटनास्थळी सोडले आहे.