मोहनीराज लहाडे

नगर : नगरमधील कांदा उत्पादनात गेल्या पाच वर्षांतच दुप्पट वाढ झाली आहे. कृषी खात्याच्या लेखी कांद्याचे सरासरी क्षेत्र ९६ हजार १५२ हेक्टर असले तरी पाच वर्षांपूर्वीच सन २०१७-१८ मध्ये ते १ लाख २५ हजार ३८९ वर पोहचले होते व आता सन २०२१-२२ मध्ये २ लाख १९ हजार ४५२ हेक्टरवर पोहचले आहे. राज्यात आता नाशिक (३ लाख ६ हजार हेक्टर) खालोखाल नगरमधील कांद्याचे क्षेत्र दुसऱ्या क्रमांकावर आहे तर कांदा उत्पादकांची संख्या  जिल्ह्यात सुमारे दीड लाखांवर गेली आहे. खरीप, लेटखरीप व रब्बी-उन्हाळी अशा तिन्ही हंगामाच्या क्षेत्राची ही एकत्रित आकडेवारी आहे.

नगर जिल्हा एकेकाळी ज्वारीची आगार समजला जात होता. ज्वारीचे सरासरी क्षेत्र ४ लाख ७७ हजार १८ हेक्टर आहे. मात्र आता त्यात सातत्याने घट सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी त्यामध्ये ३९ टक्के घट होऊन ते १ लाख ८४ हजार ७५५ हेक्टर व हरभऱ्याचे असलेले सरासरी १ लाख ५३ हजार ७२७ वरील क्षेत्र एकूण ४९ टक्क्यांनी घटून ७३ हजार ३२९ हेक्टपर्यंत आता खाली आले आहे. ज्वारी व हरभऱ्याचे घटलेले क्षेत्र, त्यावरील उत्पादक आता कांद्याकडे वळाले आहेत. ज्वारी व हरभर्याच्या तुलनेत कमी खर्चात कांद्याचा अधिक पैसा मिळू लागला आहे मिळू लागल्याने हा बदल झाला. केवळ जिल्ह्याच्या दक्षिणेतील, दुष्काळी पट्टय़ातील कांद्याचे क्षेत्र वाढले आहे असे नव्हे तर उत्तरेतील बागायती क्षेत्रातही कांदा लागवड वाढू लागली आहे. काही ठिकाणी कांद्यात उसाच्या आंतरपिकाचा, ठिबकचा प्रयोगही शेतकरी करू लागले आहेत.

कृषी खात्याच्या माहितीनुसार, सरकारी अनुदानातून ३ लाख ८७ हजार ७२५ मे. टन तर शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्वरूपात १० लाख ६३ हजार १७५ मे. टन अशी एकूण १४ लाख ५० हजार ९०० मे. टन साठवण क्षमता जिल्ह्यात निर्माण झाली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नगरमध्ये नत्रयुक्त खताचा वापर कांद्यासाठी अत्यंत कमी केला जात असल्याने अधिक कालावधीसाठी साठवण करणे शक्य होत आहे. साठवणीसाठी  कांद्याचे लागवडीपासूनच शेतकरी नियोजन करतात. कांदा नाजूक पीक मानले जात असल्याने त्याच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष द्यावे लागते. एकरी २५ ते ३० टनाहून अधिक उत्पादन काढले जाते. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्यावर्षी सरासरी ३८ ते ४० लाख क्विंटल कांद्याची आवक झाली तर यंदा ती ३३ ते ३५ लाख क्विंटल झाली. सध्या नगर बाजार समितीत चांगल्या कांद्याला प्रतीकिलो १० ते ११ रुपये भाव मिळतो आहे. रब्बी-उन्हाळी कांद्याचे क्षेत्र ६० टक्के तर खरीप आणि खरीपातील उशिराचे क्षेत्र प्रत्येकी २० टक्के आहे.

जिल्ह्यातील हवामान कांद्यासाठी पोषक आहे.  जिल्ह्यातील उत्पादनक आणि साठवण क्षमतेतही मोठी वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत कांद्याची क्षेत्र जवळपास दुप्पट वाढले आहे. कांद्यातून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे कांदा लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. कांद्याला दिवसापेक्षा रात्री टाकलेले खत अधिक फायदेशीर ठरते. कंपन्यांचे व शेतकऱ्यांकडे स्थानिक पातळीवर बियाणांची मुबलक उपलब्धता आहे.

-शिवाजीराव जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर.

गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांना कांद्याचे चांगले पैसे मिळाले. कांद्याचा खर्च कमी आणि लगेच उपलब्ध होणारे पैसे यामुळे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात कांद्याची साठवणूकही चांगल्या प्रकारे होते. ज्या वेळी मागणी असते त्यावेळी नगरमधून रोज ५०० टन कांदा निर्यात होतो. सध्या निर्यात नाही. निर्यातीच्या कंटेनरचे दर वाढले आहेत. नगरमधील कांद्याची प्रत चांगली आहे. गावरान कांद्याला चांगली मागणी आहे.

-नंदकिशोर शिक्रे, अध्यक्ष, कांदा व्यापारी संघटना, नगर.

ऊस बागायत क्षेत्रातही कांदा होऊ लागला आहे. कांद्याच्या पिकात उसाचे आंतरपीक घेऊन पाणी देण्याचे योग्य नियोजन केल्यास दोन्ही पिके चांगली येतात. नत्रयुक्त खतांचा वापर कमी होत असल्याने साठवणुकीचा कालावधी वाढतो. मात्र आता कांदा चाळीत भरण्याचे दर वाढले आहेत. मी स्वत: ऊस घेणे बंद करून कांदा उत्पादन सुरू केले आहे.

-वसंत नागुडे, कांदा उत्पादक शेतकरी, कारेगाव, श्रीरामपूर.