देशातील जनता निराश झाली आहे. लोकांच्या मनात भाजपने अपेक्षाभंग केल्याची भावना निर्माण झाल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लोकांशी संवाद साधून भाजपविषयीच्या या वास्तवाची तपासणी केल्याचा दावाही उद्धव यांनी केला आहे. ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी उद्धव यांनी राज्य सरकारच्या गेल्या दोन वर्षातील कामगिरीविषयी असमाधान व्यक्त केले. फडणवीस सरकारला आज दोन सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत जनता सराकारच्या कामगिरीविषयी समाधानी असल्याचा दावा केला होता. हे सरकार काही तरी करते आहे अशी जाणीव लोकांमध्येही निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र, मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी करून सरकारला नेहमीप्रमाणे घरचा आहेर दिला आहे.
प्रशासन आणि विचारसरणीसह अनेक मुद्द्यांविषयी भाजप आणि शिवसेनेत मतभेद आहेत. सत्तेत आल्यानंतर भाजपकडून जनतेला अपेक्षित असलेली कामगिरी झालेली नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन याविषयी खातरजमा केली आहे, असे उद्धव यांनी सांगितले.
जनतेचा पुरता भ्रमनिरास..
दरम्यान, इतके दिवस भाजपवर विश्वास ठेवून गोव्यात शिवसेनेचा विस्तार न करणे, ही आमची चूक असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीदरम्यान मान्य केले. परंतु, ही चूक आम्ही पुन्हा करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून गोव्यात कार्यरत आहे. मात्र, याठिकाणी भाजप आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष हे समविचारी पक्ष असल्यामुळे आम्ही मतांमध्ये फूट पडू नये, यासाठी गोव्यात शिवसेनेचा विस्तार करण्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. ही आमची धोरणात्मक चूक असू शकते. मात्र, भविष्यात आम्ही या चुकीची पुनरावृत्ती करणार नाही. त्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक आम्ही गंभीरपणे आणि पूर्ण ताकदीने लढवणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.