वाडा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच संबंधित हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ वाडा तालुका वैद्यकीय कर्मचारी संघटनेने निषेध केला असून येत्या गुरुवारी तालुक्यातील सर्व डॉक्टर काळ्या फिती लावून निषेध करणार आहेत.

वाडा तालुक्यातील आलमान या गावातील मोहन वसंत बदादे (२८) या बेशुद्ध अवस्थेत असलेल्या इसमाला मंगळवारी (२८ एप्रिल) संध्याकाळी साडेचार वाजता वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. यावेळी दवाखान्यात उपस्थितीत असलेले वैद्यकीय अधिकारी अतुल शिराळ, प्रशिक्षणार्थी डॉ.अभिषेक दुबे, डॉ. तरुण पांडे यांनी कोमात असलेल्या मोहन बदादे या रुग्णावर तात्काळ उपचार करून बेशुद्ध असलेल्या रुग्णाला त्वरित बेशुद्धावस्थेतून बाहेर आणले. यावेळी डॉक्टरांनी या रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णाच्या नावाचा ओपीडीमधून केस पेपर आणण्यास सांगितले. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला आधी सलाईन लावण्याची मागणी केली. या वादात यावेळी रुग्णाचे भाऊ गणेश वसंत बदादे व आई यशोदा वसंत बदादे यांनी डॉक्टरांना शिविगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा- अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परनं पोलीस कर्मचाऱ्याला चिरडलं

रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल शिराळ यांनी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर वाडा पोलीसांनी गणेश बदादे यांना तात्काळ अटक केली आहे. दरम्यान या घटनेचा पालघर जिल्हा वैद्यकीय अधिकारी संघटनेने निषेध व्यक्त केला असून येत्या गुरुवारी (३० एप्रिल) रोजी वाडा तालुक्यातील सर्व डॉक्टर काळ्या फिती लावून कामकाज करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.