क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना मदत करण्याचे धोरणच नाही, अशी स्पष्टोक्ती िपपरी पालिकेने लेखी स्वरूपात केल्यानंतर क्रीडा क्षेत्राविषयी असलेल्या अनास्थेवरून मंगळवारच्या सभेत सदस्यांनी या विभागाविषयी तीव्र भावना व्यक्त केल्या. ज्या खेडाळूंनी िपपरी-चिंचवडचा नावलौकिक देशभरात वाढविला, त्यांनाच महापालिकेने हीन स्वरूपाची वागणूक दिली, असा आरोपही झाला.
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना आर्थिक मदतीची घोषणा पालिकेने वेळोवेळी केली. मात्र, त्याची अंमलबजावणी केलीच नाही. त्यात खेळाडूंना अशी मदत करण्याचे पालिकेचे धोरणच नाही, अशी कबुली प्रशासनाने दिली, त्यामुळे नगरसेवक तोंडघशी पडले. या संदर्भात, सविस्तर वृत्त लोकसत्ताने नुकतेच प्रसिध्द केले. नोकरीसाठी खेळाडूंना राखीव जागा आहेत का, आतापर्यंत किती खेळाडूंची भरती झाली, उल्लेखनीय खेळाडूंना अनुदान दिली जाते का, ठराव मंजूर करूनही आर्थिक मदत दिली नसल्याचा प्रकार घडलाय का, असे प्रश्न राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश लांडगे यांनी सभेसाठी विचारले होते. यावरील लेखी उत्तरात प्रशासनाचा दुटप्पीपणा उघड झाला. त्यावरील चर्चेत सदस्यांनी प्रशासनावर तीव्र आगपाखड केली. लांडगे यांनी आयुक्तांवरच रोष व्यक्त केला. ते म्हणाले, गेल्या कित्येक वर्षांत खेळाडूंसाठी राखीव जागांवर भरती झाली नाही. या संदर्भातील नियम कागदावर असून आवश्यक कार्यवाही होत नाही. ज्यांनी नावलौकिक उंचावला, त्यांनाच हीन वागणूक दिली. खेळाडूंना अनुदाने जाहीर झाली, प्रत्यक्षात ती दिली गेली नाहीत.आतापर्यंतच्या आयुक्तांनी विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम केले. तुम्ही खेळाडू हिताचा संकल्प ठेवावा, अशी मागणी त्यांनी डॉ. परदेशी यांच्याकडे केली. या विषयावर श्रीरंग बारणे, सुलभा उबाळे, विनया तापकीर, रामदास बोकड यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली.
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणवंत व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचे सत्कार करण्याची प्रथा आहे. तथापि, मंगळवारी झालेल्या सभेत नगरसेवक महेश लांडगे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल व पक्षनेत्या मंगला कदम यांनी त्यासाठी आग्रह धरला. आमदार विलास लांडे यांच्या विरोधात लांडगे यांनी शड्डू ठोकले आहेत. त्यामुळे भोसरीचे वातावरण जरा तापलेले आहे. अशातच, महापौर मोहिनी लांडे यांच्या
हस्ते महेश लांडगे यांचा सत्कार घडवून आणण्याची खेळी करण्यात आली.