अलिबाग शहरातील मोबाइलचे दुकान फोडून जवळपास चार लाखांचे मोबाइल चोरून नेणाऱ्या आरोपीला अलिबाग पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली असून, त्याच्याकडून अडीच लाख रुपयांचे मोबाइल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. अलिबागमध्ये सम्राट मोबाइल नावाचे एक दुकान आहे. दोन महिन्यांपूर्वी या दुकानाचे शटर उचकटून चोरटय़ाने दुकानातील लिनोवा, सॅमसंग, पॅनासॉनिक या कंपन्यांचे तीन लाख ९३ हजार रुपयांचे ३३ मोबाइल पळवून नेले होते. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजही पोलिसांना मिळाले होते. अलिबागचे पोलीस निरीक्षक सुरेश वऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्य़ाचा तपास सुरू होता. या गुन्ह्य़ाच्या तपासात सायबर सेलचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, अलिबाग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल कांबळे, सहायक फौजदार पांडुरंग कापडेकर, पोलीस नाईक संदेश सानप, विलास म्हात्रे, ईश्वर लांबोट, रूपेश कोंडे यांनी संयुक्तपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कौशल्यपूर्ण तपास केला व आरोपीला उत्तर प्रदेशातील भदोई जिल्ह्य़ातील सीतामणी गेट येथून ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून चोरीला गेलेल्या मोबाइलपकी दोन लाख ५० हजार रुपये किमतीचे मोबाइल हस्तगत केले असून, आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.