गँगस्टर रवि पुजारीकडून कर्नाटकातील बिल्डरच्या हत्येची सुपारी घेणाऱ्या दोघा सशस्त्र तरुणांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शहर पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. मुकेश शिवाजी कांबळे (वय २६, रा. नवीन सवरेदय कॉलनी, आगाशिवनगर) गणेश लक्ष्मण सकट (२५, रा. चचेगाव ता. कराड, मूळ रा. संत पेठ, पंढरपूर) अशी अटक केलेल्या युवकांची नावे असून, त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हरसह तीन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. या दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बी. आर. पाटील यांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ निरीक्षक पाटील, सहायक फौजदार एम. ए. खान, कॉन्स्टेबल सज्जन जगताप, शशिकांत काळे, कुलदीप कोळी व प्रशांत पाटील हे पोलीस जीपमधून पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास गस्त घालत होते. त्या वेळी ढेबेवाडी फाटा येथे दोन युवक पोलीस जीपला ओव्हरटेक करीत दुचाकीवरून आगाशिवनगरच्या दिशेने वेगात निघून गेले. पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी त्या दुचाकीचा पाठलाग केला. आगाशिवनगर येथे इमर्सन कंपनीपासून यू-टर्न घेऊन संबंधित दुचाकी पुन्हा ढेबेवाडी फाटय़ाच्या दिशेने व तेथून उपमार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने गेली. नांदलापूर येथे गेल्यानंतर पुन्हा यू टर्न घेत दुचाकी कराडच्या दिशेने निघाली. दरम्यान, या कालावधीत पोलिसांनी कृष्णा रुग्णालयासमोर नाकाबंदी केली. महामार्गावर पोलिसांना पाहिल्यानंतर दुचाकी रस्त्यावरच सोडून दोन्ही युवकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावर पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही पकडले. त्यांच्या झडतीमध्ये ७.३५ एम. एम. १२ बोअरची परदेशी बनावटीची रिव्हॉल्व्हर व तीन जिवंत काडतुसे पोलिसांना मिळून आली.
अधिक चौकशीत संबंधित रिव्हॉल्व्हरमधून आपण मंगळूर-कर्नाटक येथे १० मार्च रोजी लोकनाथ शेट्टी नावाच्या बिल्डरवर त्याच्या कार्यालयात घुसून गोळीबार केल्याचे आरोपींनी सांगितले. गँगस्टर रवि पुजारीने त्यासाठी सुपारी दिली होती. मात्र गोळी न उडाल्याने संबंधित बिल्डर बचावला असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेली दुचाकी (एम एच १२ एक्स १४५१) चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधित दुचाकी आगाशिवनगर येथील एका व्यक्तीची असून, काही दिवसांपूर्वी ती चोरीस गेली होती. घटनेची नोंद कराड शहर पोलिसात झाली आहे. याप्रकरणी सर्व त्या शक्यता व संशयाच्या अनुषंगाने तपास केला जाणार आहे. यापूर्वी अटकेतील आरोपींवर कोणताही गुन्हा नोंद नसल्याची प्राथमिक माहिती आहे.