धोम-वाई हत्याकांड प्रकरणातील संतोष पोळ याला चुलती जगाबाई लक्ष्मण पोळ यांच्या चौथ्या खुनाच्या प्रकरणात आज न्यायालयाने बुधवार, दि.२१पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. हा खून जमिनीच्या व्यवहारातून झाल्याने, तसेच या व्यवहारात आणखी कोणाचा संबंध आहे काय, या बाबींचा पोलीस कसून तपास करीत आहेत.
धोम-वाई हत्याकांड प्रकरणातील सहा खून करणारा सीरियल किलर संतोष पोळ याला जगाबाई पोळ यांच्या चौथ्या खूनप्रकरणी आज दुसरे सहदिवाणी न्यायाधीश आर. के. थोरात यांच्या न्यायालयात हजर केले. या वेळी तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब होवाळ व सरकारी वकील भीमराव देशमुख यांनी आपले म्हणणे सादर केले. त्यात जगाबाई पोळ यांच्या जमिनीच्या विक्रीतून आलेल्या पशाच्या देवाणघेवाणीतून हा खून झाला असून, पोळ याने लाटलेले जमिनीच्या व्यवहारातील दोन लाख रुपये ताब्यात घेण्यासाठी, या व्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी, या कटात आणखी कोणी सामील आहे काय, जगाबाई पोळ यांचे दागिने मिळवण्यासाठी, या प्रकरणातील साक्षीदार शोधण्यासाठी, सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यावर न्या. थोरात यांनी बुधवार, दि. २१पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
यापूर्वी मंगल जेधे, सलमा शेख व नथमल भंडारी यांच्या खूनप्रकरणात पोळ व ज्योती मांढरे या दोघांवर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. मात्र जगाबाई पोळ यांच्या खुनाच्या प्रकरणात एकटय़ा पोळवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
पोळ याने ऑगस्ट २०१०मध्ये धोम येथील चुलती जगाबाई पोळ यांचा खून करून त्यांचा मृतदेह पोल्ट्री फार्मवर पुरला होता. याबाबत १९ ऑगस्टला वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.