जालना जिल्हय़ातील अंगणवाडय़ांमध्ये निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा पुरवठा होत असून, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार करूनही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप ‘सिटू’प्रणीत अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केला आहे.

संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अण्णा सावंत, जिल्हाध्यक्षा डॉ. सुनंदा तिडके, जिल्हा सचिव मधुकर मोकळे यांच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेतील संबंधित उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन निकृष्ट पोषण आहाराबाबत तक्रार केली. त्याचप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांकडे लक्ष वेधले. काही दिवसांपासून जिल्हय़ातील अंगणवाडय़ांमध्ये निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा पुरवठा केला जात आहे. तो उतरवून घेण्यास नकार दिला तर संबंधित पुरवठादाराकडून अंगणवाडी कार्यकर्तीवर दबाव टाकण्यात येतो, अशी तक्रार संघटनेने केली आहे.

महिला व बालकल्याण विकास विभागाच्या आयुक्तांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव २४ नोव्हेंबर २०१६ रोजी राज्य शासनाकडे सादर केला असला तरी त्या संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. हा प्रस्ताव तातडीने मान्य करण्याची मागणी संघटनेने केली आहे. मानधन एकरकमी आणि दरमहा देण्यात यावे, थकीत इंधन बिल आणि प्रवास भत्ता द्यावा, अतिरिक्त कामाचा बोजा कमी करावा, मिनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मागील फरकासह वाढीव मानधन द्यावे, दोन वर्षांत निवृत्त झालेल्या किंवा राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना सेवासमाप्ती लाभ मिळवून द्यावा, दुधना काळेगाव येथील ऑगस्ट २०१५ पासून थकलेले इंधन बिल देण्यात यावे, घनसावंगी आणि मंठा तालुक्यातील एक वर्षांपासून थकीत असलेले बचतगटाचे इंधन बिल द्यावे, इत्यादी मागण्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केल्या आहेत. इंधन बिल मिळत नसल्यामुळे पोषण आहार शिजवण्यात अडचणी येतात. तसेच आहाराचा निकृष्ट पुरवठा झाल्यामुळे त्याच्या दर्जावर परिणाम होतो. त्यामुळे जिल्हा पातळीवरील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केली आहे.