हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीतर्फे शिवसेनेचे विद्यमान खासदार सुभाष वानखेडे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली, मात्र काँग्रेस की राष्ट्रवादी हा आघाडीतील तिढा कायम असल्याने माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांचे समर्थक हिरमुसल्याचे चित्र आहे.
वानखेडे यांनी विविध कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमातून मतदारसंघात संपर्क वाढवून प्रचाराला प्रारंभ केला. परंतु त्यांच्या विरोधात आघाडीकडून कोण उतरणार, हा तिढा कायम आहे. भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी हिंगोली दौरा केला. परंतु त्यांचा उमेदवार व भूमिका काय, हे स्पष्ट झाले नाही. याबरोबरच तिसरी आघाडी, मनसे यांची भूमिका व उमेदवार याविषयीही कोणतीच चर्चा नाही. जागा काँग्रेसला सुटलीच, तर राष्ट्रवादीचे माजी खासदार शिवाजीराव माने आघाडी धर्म पाळणार की नवीन घरोबा करणार, याविषयी मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
हिंगोलीच्या जागेसाठी आमदार राजीव सातव, सूर्यकांता पाटील यांचे वर्षभरापासून प्रयत्न सुरू असून ही जागा कोणाला सुटणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीतर्फे अ‍ॅड. शिवाजी जाधव, अ‍ॅड. शिवाजी माने, आमदार प्रदीप नाईक यांची नावेही चर्चेत आहेत.
आमदार सातव यांना उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेसमधून वरिष्ठांचे प्रयत्न सुरू आहेत. आठ दिवसांपूर्वी शरद पवार यांनी नवी दिल्लीत सूर्यकांता पाटील यांना निवडणूक कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. मात्र, उमेदवारीच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर झाले नसल्याने त्यांचे समर्थक हिरमुसल्याचे चित्र आहे.