सत्तेत राहूनही सर्वसामान्य माणसाबद्दल कळवळा बाळगणाऱ्या आर. आर. पाटील यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही. त्यांचा साधेपणा व जनतेविषयी बांधिलकी बाळगणे हीच त्यांना खरीखुरी श्रद्धांजली होय, अशा भावना येथे व्यक्त करण्यात आल्या.
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना बुधवारी परभणीत सर्वपक्षीयांनी श्रद्धांजली वाहिली. मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात विविध पक्षांचे नेते, कार्यकत्रे व आबांचे चाहते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. विविध राजकीय नेत्यांनी आबांविषयीच्या आठवणी सांगितल्या. बँकेचे प्रभारी अध्यक्ष सुरेश देशमुख म्हणाले, की आबांसारखा चारित्र्यवान नेता हरपला, ही एका पक्षाची हानी नाही तर साऱ्या महाराष्ट्राचे नुकसान आहे. आमदार विजय भांबळे यांनी कार्यकर्त्यांना जोपासणारा हा दिलखुलास नेता होता. त्यांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, अशा भावना व्यक्त केल्या. आबांनी पदाचा उपयोग सर्वसामान्य व गोरगरिबांसाठी केला, असे जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर यांनी सांगितले. मध्यवर्ती बँकेचे संचालक रमेशराव दुधाटे यांनी साध्या पोस्टकार्डवर ते लोकांचे प्रश्न सोडवत होते. त्यांची नेहमीच उणीव भासेल, असे सांगितले. संत गाडगेबाबा स्वच्छता व गाव तंटामुक्त अभियानातून आबांनी ग्रामीण भागाचा कायापालट केला, असे स्वराजसिंह परिहार यांनी म्हटले.
माजी खासदार सुरेश जाधव, संतोष बोबडे, शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष गंगाधर जवंजाळ, काँग्रेसचे बाळासाहेब देशमुख, कल्याणराव रेंगे पाटील, अॅड. विष्णू नवले, शशिकला चव्हाण व सोनाली देशमुख यांनीही भावना व्यक्त केली. महापौर संगीता वडकर, बाळासाहेब जामकर, व्यंकट डहाळे, बाळासाहेब बुलबुले, नारायण मुंडे, नदीम इनामदार, श्रीधर देशमुख, नंदा राठोड, वीणा चव्हाण आदी उपस्थित होते. रमाकांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R r patil is great leader