जिल्ह्य़ातील सटाणा, मालेगावसह काही भागांत मंगळवारी सायंकाळी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागांत तुरळक गारपीटही झाली. या पावसाचा फटका द्राक्ष, डाळिंबासह इतर पिकांना बसणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे. नामपूर येथे भवानीमातेच्या यात्रोत्सवात अवकाळी पावसाने भाविकांची धांदल उडवून दिली.
मागील वर्षभरापासून नैसर्गिक आपत्तीच्या सावटाखाली असलेल्या जिल्ह्य़ात मंगळवारी अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून थंडी ओसरली असून उन्हाचे चटके बसत आहेत. सकाळपासून अनेक भागांत ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाचच्या सुमारास मालेगाव, सटाणा तालुक्यांसह काही भागांत वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. काही वेळातच पाऊसही सुरू झाला. नामपूर येथे भवानीमातेचा यात्रोत्सव सुरू आहे. अचानक आलेल्या पावसाने विक्रेते आणि भाविकांची एकच धांदल उडाली. सटाणा तालुक्यात साधारणत: एक तास पाऊस सुरू होता. मालेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. झोडगे परिसरात गारा पडल्या. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू आहे. वर्षभर गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले असताना अखेरच्या टप्प्यात हे संकट कोसळल्याने उत्पादक हवालदिल झाला आहे. द्राक्षाबरोबर डाळिंब आणि इतर पिकांचे नुकसान होणार असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात आले. डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हजारो हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली होती. वर्षभरात पिकांच्या नुकसानीचा आकडा बराच मोठा आहे. त्यात या अवकाळी पावसाने पुन्हा भर पडणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Feb 2015 रोजी प्रकाशित
नाशिकमध्ये पुन्हा गारांसह पाऊस
जिल्ह्य़ातील सटाणा, मालेगावसह काही भागांत मंगळवारी सायंकाळी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
First published on: 11-02-2015 at 05:13 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rains hailstorm again hit nashik