अवकाळी पावसाचे संकट शुक्रवार व शनिवारी अधिकच तीव्र झाले. नाशिक व धुळे जिल्ह्य़ातील काही भागात सलग चौथ्या दिवशी गारपीट व पावसाचा तडाखा बसला. निफाड व देवळा तालुक्यात सायंकाळी तुफान गारपीट झाली. हजारो हेक्टरवरील द्राक्ष, कांदा, डाळिंब, गहू यासह इतर पिकांचे कोटय़वधींचे नुकसान झाले आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्य़ात ४०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. १४४ गावांतील ९४१९ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला.
चार दिवसांपूर्वी सुरू झालेल्या पावसाने शनिवारी सकाळी शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह पुन्हा हजेरी लावली. सायंकाळी निफाड व देवळा तालुक्यासह आसपासच्या भागात गारपीट झाली. गारपिटीने द्राक्ष बागा भुईसपाट झाल्या आहेत. साधारणत: तासभर गारपीट व पाऊस झाला. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असतानाच हे संकट कोसळल्याने हातातोंम्डाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याची भावना व्यक्त होत आहे. मागील चोवीस तासात नाशिक, निफाड, कळवण व दिंडोरी या तालुक्यांत किमान ३२ ते कमाल ७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सिन्नरला गारपिटीने झोडपले. या ठिकाणी ४२ मिलीमीटर पाऊस झाला. अवकाळी पावसाचा फटका नाशिक तालुक्यातील १०, कळवण १९, दिंडोरी ५१, चांदवड १०, सिन्नर २३, निफाड २४, त्र्यंबकेश्वर ५ अशा एकूण १४४ गावांना बसला. परिसरातील द्राक्ष, डाळिंब, गहू व कांदा यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. जवळपास दहा हजार शेतकरी बाधीत झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. वीज पडून पाच बैल व एक गाय मरण पावली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने जिल्ह्य़ातील १६९० हेक्टरवरील पिके बाधीत झाली होती. त्यावेळी ४४ गावांना पावसाचा फटका बसला होता.
धुळे जिल्ह्य़ात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने थैमान घातले आहे. १२१ गावांमध्ये दोन हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली. पालकमंत्री दादा भुसे यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, नैसर्गिक आपत्तीच्या फेऱ्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदत दिली जात नसल्याची तक्रार केली जात आहे. सप्टेंबर ते डिसेंबर २०१४ या कालावधीत गारपीट व अवकाळी पावसाने सलग चार वेळा जिल्ह्य़ातील एकूण ३२ हजार ५१९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यापोटी १२३ कोटीहून अधिकची मदत अद्याप मिळालेली नाही. मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या सुमारे ८० हजार आहे. नवीन वर्षांत या संकटाचा तडाखा सातत्याने बसत असून नुकसानीचे प्रमाणही दिवसागणीक वाढत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2015 रोजी प्रकाशित
उत्तर महाराष्ट्रात पुन्हा गारपीट
नाशिक व धुळे जिल्ह्य़ातील काही भागात सलग चौथ्या दिवशी गारपीट व पावसाचा तडाखा बसला.

First published on: 15-03-2015 at 01:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rains hailstorm again hit north maharashtra