जव्हारचे रतन बूधर, कागलचे दत्तात्रय माने आणि तलासरी येथील आदिवासी प्रगती मंडळ संचलित विद्यालय यांना येथील कॉ. नरेंद्र (नाना) मालुसरे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने देण्यात येणारे ‘दीपस्तंभ’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. येथील खुटवडनगरमधील सिटू भवनात बुधवारी सायंकाळी ४.३० वाजता अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी, कुमार शिराळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा होणार असल्याची माहिती संस्थेच्या विश्वस्त अनुराधा मालुसरे यांनी  दिली.
पुरस्काराचे यंदाचे १४ वे वर्ष असून, ११ हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र, पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासी क्षेत्रात गोदूताई परूळेकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात ऐन तरूणपणी उडी घेणारे जव्हार तालुक्यातील वांगणी (वावर) येथील कॉ. रतन रावजी बूधर यांची उत्कृष्ट किसान कार्यकर्ता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ओझरखेड येथील आदिवासी एकाधिकार खरेदीतील भ्रष्ट पद्धती आणि पोलीस अत्याचाराविरुद्धच्या लढय़ात कॉ. मंगल्या भोगाडय़ा यांच्याबरोबर बूधर हे अग्रभागी होते. वन विभागाची जागा कसणाऱ्यांच्या नावावर होण्यासाठी लढा व तुरुंगवास, वनाधिकार कायदा व रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी, खडखड धरणग्रस्तांचे पुनर्वसन आदी आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.
आदर्श कामगार म्हणून कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील बेळुंकीवाडी येथील कॉ. दत्तात्रय हरी माने यांना सन्मानित करण्यात येणार आहे. १९६८ मध्ये कॉ. एस. पी. पाटील, कॉ. के. एल. मलाबादे, शांताराम गरूड यांच्या नेतृत्वाखाली यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतन कायद्यासाठी दोन महिने करण्यात आलेल्या संपात सहभाग, १९७१ मध्ये निकृष्ठ प्रतीच्या सूतामुळे मिळणाऱ्या कमी पगाराची भरपाई मिळावी, यासाठी सर्व कामगारांना एकत्रित करून संप, यंत्रमाग कामगारांच्या पगारवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे ४९ टक्के पगारवाढ, अशा अनेक यशस्वी आंदोलनांची नोंद माने यांच्या नावावर आहे.
ठाण्याच्या तलासरी तालुक्यातील उधवा येथील आदिवासी प्रगती मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची आदर्श शिक्षण संस्था पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. संस्थेने आदिवासी विद्यार्थ्यांच्या सोयीकरीता ११ वी आणि १२ वी ची कला व वाणिज्य शाखा सुरू केली आहे. पुढील वर्षांपासून विज्ञान शाखा सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेच्या वतीने प्राचार्य दिनकर कोल्हे पुरस्कार स्वीकारणार आहेत.
पुरस्कार सोहळ्यात आदिवासी भागातील गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त संजय मालुसरे यांनी दिली.