रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील ओणी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करुन अधिक तपास करण्यात येत आहे. याबाबतची माहिती राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यानी राजापूर वनविभागाला दिली असल्याची माहिती राजापूर वनविभागाने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

राजापूर वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ओणी, राजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ या रस्त्यावर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. याविषयीची माहिती पोलीस निरीक्षक राजापूर अमित यादव यांनी दूरध्वनी वरून वनविभागाला दिली. राजापूर वनविभागाने तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना या घटनेची माहिती देऊन पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता महामार्गाच्या उजव्या बाजूला वन्यप्राणी नर जातीचा बिबट्या निपचित पडलेला दिसून आला. बिबट्याची पाहणी केली असता अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याच्या तोंडाला व डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने नोंदविला आहे.

पशुधन विकास अधिकारी राजापूर वैभव चोपडे यांनी या मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. हा बिबट्या नर जातीचा असून अंदाजे ३ ते ४ वर्षांचा असल्याची माहितीही वनविभागाने दिली आहे. या घटनेचा गुन्हा नोंदविण्यात येवून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

याची कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, जयराम बावधने वनपाल राजापूर, विक्रम कुंभार वनरक्षक राजापूर, नीलेश म्हादये यांनी केली .