राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील जवाहर चौकामध्ये शिमगोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान होळी मशिदीच्या पायऱ्यांवर टेकवण्यावरून झालेल्या वादानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी, या घटनेची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर समाजमाध्यमावरून मतमतांतरे उमटत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजापूर तालुक्यातील धोपेश्वर येथील होळी ही तालुक्यातील सर्वात मोठी होळी मानली जाते. ही होळी दरवर्षी एका ठरावीक मार्गाने जाते. तसेच दरवर्षी या मार्गावर येणाऱ्या जामा मशिदीच्या पायऱ्यांवर ती टेकवण्यात येते. मात्र, यंदा शिमगोत्सवाची मिरवणूक मशिदीजवळ आली असताना मशिदीचे प्रवेशद्वारबंद होते.

यावरून येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही बाजूंनी घोषणा सुरू झाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवरून प्रसारित झाल्यानंतर त्यावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पोलिसांनी मात्र कायदा-सुव्यवस्था सुरळीत असल्याचा दावा केला आहे. तसेच या चित्रफितीच्या आधारे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, कुडाळचे आमदार नीलेश राणे यांनी याप्रकरणी समाजमाध्यमावरून प्रसारित केलेल्या चित्रफितीत ‘आपण कोकण पेटू देणार नाही’ अशी प्रतिक्रिया दिली. तसेच समाजमाध्यमांनी येथील वातावरण बिघडवू नये, असे आवाहनही केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratnagiri tense peace prevails in rajapur after dispute between two groups ssb